Baba Ramdev Misleading Ads Case | बाबा रामदेव यांनी सुप्रीम कोर्टासमोर मागितली ‘बिनशर्त माफी’, ‘पतंजली’शी संबंधित प्रकरण काय?

Baba Ramdev Misleading Ads Case | बाबा रामदेव यांनी सुप्रीम कोर्टासमोर मागितली ‘बिनशर्त माफी’, ‘पतंजली’शी संबंधित प्रकरण काय?

पुढारी ऑनलाईन : दिशाभूल करणाऱ्या जाहिरातींशी संबंधित अवमानना खटल्याच्या सुनावणीसाठी योगगुरू बाबा रामदेव आणि पतंजली आयुर्वेदचे व्यवस्थापकीय संचालक आचार्य बाळकृष्ण आज मंगळवारी सर्वोच्च न्यायालयात हजर झाले. १९ मार्च रोजी न्यायालयाने बाबा रामदेव यांना सुनावणीवेळी प्रत्यक्ष हजर राहण्यास सांगितले होते. त्यानुसार, ते आज सर्वोच्च न्यायालयात हजर झाले. (Patanjali hearing) दरम्यान, पतंजलीच्या औषधी उत्पादनांच्या दिशाभूल करणाऱ्या जाहिरातींबद्दल सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाचे उल्लंघन केल्याबद्दल त्यांनी न्यायालयासमोर बिनशर्त माफी मागितली. (Baba Ramdev Misleading Ads Case)

"ते (बाबा रामदेव) माफी मागण्यासाठी येथे वैयक्तिकरित्या उपस्थित आहेत," असे पतंजलीची बाजू मांडणाऱ्या वकिलांनी न्यायालयाला सांगितले. त्यांची न्यायालयातील उपस्थिती आणि बिनशर्त माफीची दखल घ्यावी, अशी विनंती बाबा रामदेव यांच्या वकिलांनी न्यायालयात केली. दरम्यान, जे घडले ते घडायला नको होते, असे सॉलिसिटर जनरल तुषार मेहता यांनी पतंजलीच्या 'दिशाभूल करणाऱ्या' जाहिरात प्रकरणाच्या सुनावणीवेळी म्हटले.

सर्वोच्च न्यायालयाने बाबा रामदेव आणि बाळकृष्ण यांच्याविरुद्ध खोटी साक्ष दिल्याबद्दल खटला चालवावा असे म्हणत दोघांना आठवडाभरात नवीन प्रतिज्ञापत्र दाखल करण्यासाठी मुदत दिली. या प्रकरणी आता पुढील सुनावणी १० एप्रिल रोजी होणार असून सुनावणीच्या पुढील तारखेला प्रतिवादी उपस्थित राहतील, असेही न्यायालयाने सांगितले.

"उत्तर दाखल करण्यासाठी एका आठवड्याची शेवटची संधी देण्यात आली आहे. आयुष मंत्रालयाने ४२ पानांचे तपशीलवार प्रतिज्ञापत्र दाखल केले आहे," असेही सर्वोच्च न्यायालयाने सांगितले.

पतंजली आयुर्वेदने औषधी उपचारांबद्दल दिशाभूल करणाऱ्या जाहिराती प्रकाशित करणे सुरू ठेवल्याने न्यायालयाने यापूर्वी त्यांना अवमानना नोटीस बजावली होती. पतंजली आयुर्वेदच्या दिशाभूल करणाऱ्या जाहिरातींवरून बाबा रामदेव आणि आचार्य बाळकृष्ण यांच्याविरुद्धच्या अवमानना कारवाईत कारणे दाखवा नोटीसला उत्तर न दिल्याबद्दल सर्वोच्च न्यायालयाने दोघांना वैयक्तिकरित्या न्यायालयात हजर राहण्याचे निर्देश दिले होते.

पतंजलीने औषधोपचारांवर खोट्या आणि दिशाभूल करणाऱ्या जाहिराती प्रसिद्ध केल्याबद्दल सर्वोच्च न्यायालयाने याआधी नाराजी व्यक्त केली होती. न्यायमूर्ती हिमा कोहली आणि अहसानुद्दीन अमानुल्ला यांच्या खंडपीठाने रामदेव यांच्यावर अवमानना कारवाई का सुरू करू नये, यासाठी कारणे दाखवा नोटीसही बजावली होती. (Baba Ramdev Misleading Ads Case)

सर्वोच्च न्यायालयाने पतंजलीला ड्रग्ज अँड मॅजिक रेमेडीज (आक्षेपार्ह जाहिराती) कायदा, १९५४ मध्ये नमूद केलेल्या आजार आणि विकारांवर उपचार करण्याचा दावा करणाऱ्या उत्पादनांच्या सर्व जाहिराती थांबवण्याचे निर्देशही दिले होते.

"तुम्ही आमच्या आदेशाचे उल्लंघन कसे करू शकता?; आम्ही आधी आमचे हात बांधले होते, पण आता नाही (अवमानना कारवाई सुरू करण्यासोबतच)," असे न्यायालयाने पतंजली आयुर्वेदची बाजू मांडणारे वरिष्ठ वकील मुकुल रोहतगी यांना सांगितले होते.

आधुनिक वैद्यकशास्त्रावर टीका केल्याबद्दल बाबा रामदेव यांच्यावर कारवाई करण्याची मागणी करणाऱ्या इंडियन मेडिकल असोसिएशनने (आयएमए) दाखल केलेल्या याचिकेवरील सुनावणीवेळी सर्वोच्च न्यायालयाने ही टिप्पणी केली होती. (Patanjali hearing)

 हे ही वाचा :

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news