Lok Sabha Elections 2024 : प. बंगालमध्‍ये काँग्रेस-माकपची भाजपशी हातमिळवणी : ममता बॅनर्जींचा गंभीर आरोप | पुढारी

Lok Sabha Elections 2024 : प. बंगालमध्‍ये काँग्रेस-माकपची भाजपशी हातमिळवणी : ममता बॅनर्जींचा गंभीर आरोप

पुढारी ऑनलाईन डेस्‍क : प. बंगालमध्‍ये माकप आणि काँग्रेस भाजपसाठी काम करतातय. या दोन्‍ही पक्षांनी भाजपशी हातमिळवणी केली आहे, असा गंभीर आरोप करत लोकसभा निवडणुकीत भाजपने २०० पेक्षा अधिक जागा जिंकून दाखवा, असे आव्‍हान तृणमूल काँग्रेसच्‍या सर्वेसर्वा आणि पश्‍चिम बंगालच्‍या मुख्‍यमंत्री ममता बॅनर्जी यांनी आज ( दि. ३१ मार्च) दिले. एका जाहीर सभेत त्‍या बोलत होत्‍या.

भाजपने २०० पेक्षा अधिक जागा जिंकून दाखवाव्‍यात

यावेळी ममता बॅनर्जी म्‍हणाल्‍या की, लोकसभा निवडणूक प्रचारात भाजप ४०० पार असा नारा देत आहे. मी त्‍यांना आव्‍हान देते की, त्‍यांनी आधी २०० जागा जिंकून दाखवाव्‍यात. पश्‍चिम बंगालमध्‍ये 2021 मध्‍ये झालेल्‍या विधानसभा निवडणुकीत भाजपने 200 हून अधिक जागा जिंकणार असल्‍याची वल्‍गना केली होती; परंतु त्यांना केवळ 77 जागांवरच समाधान मानावे लागले.

नागरिकत्‍व सुधारणा कायदा हा कायदेशीर नागरिकांना परदेशी बनवण्याचा सापळा आहे. पश्चिम बंगालमध्ये CAA किंवा NRC लागू होऊ देणार नाही, असा पुन्‍नरुच्‍चारही त्‍यांनी केला.

तृणमूल काँग्रेसच्या उमेदवार महुआ मोईत्रा यांच्या समर्थनार्थ टीएमसी प्रमुख बॅनर्जी यांनी कृष्णानगरमध्ये निवडणूक रॅलीला संबोधित केले. त्यांनी विरोधी पक्षांच्या इंडिया आघाडीतील मित्र पक्ष सीपीआय(एम) आणि काँग्रेसवर भाजपशी हातमिळवणी केल्याचा गंभीर आरोपही त्‍यांनी केला. पश्चिम बंगालमध्ये इंडिया आघाडी नाही. पश्‍चिम बंगालमध्ये माकप आणि काँग्रेस भाजपसाठी काम करत आहेत, असा आरोपही त्‍यांनी केला.

तृणमूल काँग्रेसच्‍या खासदार महुआ मोईत्रा यांचा अपमान करण्यात आला. त्यांनी भाजपविरोधात आवाज उठवल्यामुळे त्यांची लोकसभेतून हकालपट्टी करण्यात आली, असा दावाही त्‍यांनी केला.

हेही वाचा : 

Back to top button