केजरीवालांना अटक हा लोकशाहीवरील हल्‍ला : ‘इंडिया’ आघाडीच्‍या महासभेत शरद पवारांचा केंद्रावर हल्‍लाबोल | पुढारी

केजरीवालांना अटक हा लोकशाहीवरील हल्‍ला : 'इंडिया' आघाडीच्‍या महासभेत शरद पवारांचा केंद्रावर हल्‍लाबोल

पुढारी ऑनलाईन डेस्‍क : अरविंद केजरीवाल यांच्या अटकेच्या निषेधार्थ दिल्लीतील रामलीला मैदानावर इंडिया आघाडीच्या वतीने आज (दि. ३१ मार्च) महासभा आयोजित केली आहे. या वेळी राष्‍ट्रवादी काँग्रेस पक्ष-शरदचंद्र पवारचे अध्‍यक्ष शरद पवार यांनी केंद्र सरकारच्‍या धोरणांवर हल्‍लाबोल केला.

शरद पवार म्‍हणाले की, “केंद्र सरकारने दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल, झारखंडचे मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांना अटक केली आहे. विविध राज्यांतील अनेक नेत्यांना तुरुंगात टाकले आहे. ही कृती लोकशाहीवरील हल्ला आहे . आता संविधान वाचवण्याची जबाबदारी आपल्‍या सर्वांची आहे.”

केजरीवालांना जास्त काळ तुरुंगात ठेवू शकणार नाहीत

यावेळी दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या पत्नी सुनीता केजरीवाल म्हणाल्‍या, “तुमच्याच केजरीवाल यांनी तुरुंगातून तुमच्यासाठी संदेश पाठवला आहे. हा मेसेज वाचण्यापूर्वी मला तुम्हाला काही विचारायचे आहे. आमचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी माझ्या पतीला तुरुंगात टाकले, पंतप्रधानांनी बरोबर केले का? केजरीवालजी हे खरे देशभक्त आणि प्रामाणिक व्यक्ती आहेत यावर तुमचा विश्वास आहे का? हे भाजपवाले म्हणतात की, केजरीवाल तुरुंगात आहेत, त्यांनी राजीनामा द्यावा का? तुमचे केजरीवाल सिंह आहेत, ते त्यांना जास्त काळ तुरुंगात ठेवता येणार नाही, असा विश्‍वासही त्‍यांनी व्‍यक्‍त केला. (INDIA alliance rally)

कोठडीतून केजरीवालांचा पत्राद्वारे देशवासियांना संदेश

केजरीवाल यांच्या पत्नी सुनिता यांनी वाचून दाखवलेल्या पत्रात म्हटले आहे की, चला स्वप्नातला भारत घडवूया जिथे सर्वाना पोटभर अन्न, प्रत्येकाच्या हाताला काम चांगले आरोग्य, शिक्षण आणि सर्व सुविधा मिळतील. चांगल्या भारतात सर्वांना न्याय मिळेल. समाजात एकोपा असेल. गरीब लोकांना वीज मोफत मिळेल. प्रत्येक गावात सरकारी शाळा बनवू, प्रत्येक गावात मोहल्ला क्लिनिक बनवू. प्रत्येक जिल्ह्यात विशेष सरकारी रुग्णालय त्यामध्ये प्रत्येकाला मोफत उपचार मिळतील. शेतकऱ्यांसाठी स्वामीनाथन आयोगाच्या शिफारशीनुसार सुविधा देणार, दिल्लीला पूर्ण राज्याचा दर्जा मिळवून देणार अशी आश्वासने अरविंद केजरीवाल यांनी कोठडीतून लिहलेल्या पत्राच्या माध्यमातून दिले आहेत. (INDIA alliance rally)

INDIA alliance rally: इंडिया आघाडीला संधी द्या..

सध्या देशात सुरू असलेल्या कारवाया, वातावरण यामुळे भारत आणि भारतमाता खूप दु:खी आहे. त्यामुळे भारतात दडपशाही चालणार नाही, असेही केजरीवालांनी म्हटले आहे. इंडिया केवळ गठबंधन नाही तर हद्‍यात इंडिया आहे. त्यामुळे इंडिया आघाडीला संधी द्या, विकसित भारत घडवू या, असे आवाहन केजरीवाल यांनी केले आहे.  अटकेमुळे माझा आत्मविश्वास आणखी वाढला आहे, असेही अरविंद केजरीवा यांनी लिहलेल्या पत्रात नमूद केले आहे.

INDIA आघाडीतील पक्षाचे प्रमुख नेते उपस्थित

इंडिया आघाडीतील घटकपक्ष असलेल्या आम आदमी पक्षाचे नेते आणि दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना ‘ईडी’ने अटक केली. त्यासोबतच विरोधी पक्षांवर होत असलेल्या कारवाया या सगळ्या गोष्टींचा निषेध करण्यासाठी इंडिया आघाडीची मोठी सभा दिल्लीतील रामलीला मैदानावर सुरू आहे. यामध्ये इंडिया आघाडीतील पक्षाचे प्रमुख नेते हजर आहेत. इंडिया आघाडीच्या या महासभेला काँग्रेस नेते राहुल गांधी, राष्ट्रवादी काँग्रेसचे शरद पवार, उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे उद्धव ठाकरे, खासदार संजय राऊत, आरजेडीचे तेजस्वी यादव, सपा प्रमुख अखिलेश यादव, सीताराम यच्चुरी, डी राजा, पीडीपीच्या मेहबुबा मुक्ती, नॅशनल कॉन्फरन्सचे फारूक अब्दुल्ला झारखंडचे मुख्यमंत्री चंपाई सोरेन, हेमंत सोरेन यांच्या पत्नी कल्पना सोरेन, पंजाब मुख्यमंत्री भगवंत मान यांच्यासह अरविंद केजरीवालांच्या पत्नी सुनिता केजरीवाल देखील उपस्थित आहेत.

Back to top button