Lok Sabha election : बारामतीत राष्ट्रवादी अजित पवार गटाकडून सुनेत्रा पवारांना उमेदवारी जाहीर | पुढारी

Lok Sabha election : बारामतीत राष्ट्रवादी अजित पवार गटाकडून सुनेत्रा पवारांना उमेदवारी जाहीर

बारामती, पुढारी वृत्तसेवा : बारामती लोकसभा मतदारसंघातून सुनेत्रा अजित पवार या उमेदवार असतील, अशी घोषणा राष्ट्रवादीच्या अजित पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी आज ( दि. ३० मार्च) केली. राष्ट्रवादीच्या शरद पवार गटाकडूनही शनिवारी जाहीर झालेल्या यादीत बारामतीतून विद्यमान खासदार सुप्रिया सुळे यांनाच उमेदवारी देण्यात आली आहे. त्‍यामुळे आता बारामतीत अधिकृतपणे नणंद विरुद्ध भावजय असाच सामना रंगणार असल्यावर शिक्कामोर्तब झाले आहे.

गेली दीड महिने अजित पवार गटाकडून सुनेत्रा पवार याच उमेदवार असतील याचे स्पष्ट संकेत देण्यात आले होते. खुद्द सुनेत्रा पवार या गेली महिनाभरापासून प्रचारात व्यस्त आहेत. मतदारसंघातील सहाही विधानसभा क्षेत्रात त्‍या प्रचार करत आहेत. त्यांच्या नावाची औपचारिक घोषणा बाकी होती, आज ती झाली.

राष्‍ट्रवादीच्‍या शरद पवार गटाकडून सुप्रिया सुळे यांची उमेदवारी पक्की होती. त्या मुळे त्या गेली तीन महिन्यांपासूनच प्रचारात व्यस्त होत्या. बारामतीत प्रथमच पवार विरूध्द पवार अशी लढत होणार असल्याने अनेक तर्कवितर्क लढविले जात आहेत. दोन्ही बाजूंची प्रतिष्ठा येथे पणाला लागली आहे. संपूर्ण देशातील राजकीय वर्तुळाचे या लढतीकडे लक्ष आहे.

बारामतीत आता नणंद विरुद्ध भावजय असा सामना रंगणार असून यंदाची ही निवडणूक कमालीची लक्षवेधी ठरणार आहे. राज्यासह देशाचे लक्ष या निवडणूकीकडे लागले आहे. महायुतीकडून सुनेत्रा पवार लढणार आहेत. तत्पूर्वी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी इंदापूरातील माजी मंत्री हर्षवर्धन पाटील, पुरंदरमध्ये माजी मंत्री विजय शिवतारे यांची समजूत काढली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यात महत्त्वाची भूमिका बजावली.

हेही वाचा : 

Back to top button