Rangpanchami 2024 : कृत्रिम रंग वापरताय? वेळीच सावध व्हा! ‘अशी’ घ्या त्वचेची काळजी | पुढारी

Rangpanchami 2024 : कृत्रिम रंग वापरताय? वेळीच सावध व्हा! 'अशी' घ्या त्वचेची काळजी

पुढारी ऑनलाईन डेस्क : आज (दि.३०) रंगपंचमीदिवशी (Rangpanchami 2024) मनसोक्त रंग खेळला जातो. मात्र, अनेकवेळा चुकीच्या पद्धतीने रंग खेळल्यामुळे त्वचेची हानी होते. त्यासाठी रंग खेळण्याआधी आणि नंतर काळजी घेणे महत्त्वाचे आहे. कृत्रिम रंगांमुळे प्रदूषणात वाढ तर होतेच शिवाय त्वचेच्या समस्याही निर्माण होतात. त्यामुळे, रंगांचा बेरंग न होण्यासाठी नैसर्गिक रंग वापरुन आनंदोत्सव साजरा करावा, असे आवाहन तज्ज्ञांनी केले आहे.

आज रंगोत्सव (Rangpanchami 2024)साजरा होत आहे. यावेळी कृत्रिम रंगांचा वापर अधिक होत असल्याने त्याचे दुष्परिणाम नंतर जाणवतात. रंग खेळायला जाताना प्रथम रंगाची निवड महत्त्वाची ठरते. सेंद्रिय व नैसर्गिक रंग वापरणे आरोग्याच्या हिताचे असते. बाजारात हिरवा, जांभळा, काळा, लाल, निळा आदी गडद रंगांमध्ये कॉपर सल्फेट, लीड ऑक्साईड, अॅल्युमिनियम ब्रोमाइड, प्रशियन ब्लू, मर्क्युरी सल्फाइट, कोबाल्ट नायट्रेट हानिकारक रासायनिक घटक असतात. त्यामुळे, हर्बल रंगांचा वापर करावा, केसांना तेल, त्वचेला मॉईश्चरायझर वापरावे.

रासायनिक रंग हवेत उडल्याने श्वसनाचे विकार होतात. त्वचेवर खाज सुटणे, कोरडेपणा, त्वचा सोलणे, एक्जिमा होऊ शकतो. रंगाच्या अॅलर्जीमुळे त्वचेला फोड येणे, डोळे चुरचुरणे अशा तक्रारी अधिक असतात. अयोग्य रंगाच्या वापरामुळे त्वचा लाल होते. त्वचेचे पातळ पापुद्रे निघतात. जास्त काळ कपडे ओले राहिल्यास कॅनडिडा होतो. चेहऱ्यावरुन रंग सहजासहजी उतरत नाहीत. रसायने आणि कडक उन्हामुळे त्वचा कोरडी पडू शकते. अशावेळी शक्य तितक्या लवकर शरीरावरील रंग काढण्याचा प्रयत्न करावा. ओल्या रंगांचा वापर केल्यास स्नानासाठी थंड पाणी वापरावे. थंड पाण्याचा वापर केल्याने रंग त्वचेतील रंध्रात शिरत नाहीत. (Rangpanchami 2024)

Rangpanchami 2024 : नैसर्गिक रंगांना मागणी

बाजारात नैसर्गिक रंग प्रति किलो ३०० रुपयाला मिळतो. कृत्रिम रंग मात्र ८० ते १०० रुपयाला मिळतो. फळ, फुले व बियापासून हा रंग तयार केला जातो. हा रंग शरीराला चिकटून राहत नाही. डोळ्यात व तोंडात गेल्यावर त्याचा परिणाम जाणवत नाही. विविध कंपन्यांनी हर्बल रंग बाजारात आणले असून त्याला प्रतिसादही मिळत आहे.

हेही वाचा : 

Back to top button