Sanjiv Bhatt Drugs Case : माजी IPS अधिकारी संजीव भट्ट यांना 20 वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा! | पुढारी

Sanjiv Bhatt Drugs Case : माजी IPS अधिकारी संजीव भट्ट यांना 20 वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा!

पुढारी ऑनलाईन डेस्क : Sanjiv Bhatt Drugs Case : पालनपूरच्या 1996 च्या एनडीपीएस प्रकरणात माजी आयपीएस अधिकारी संजीव भट्ट यांना न्यायालयाने 20 वर्षांची सक्तमजुरी आणि 2 लाख रुपये दंडाची शिक्षा सुनावली आहे. या निकाला नंतर भट्ट यांना पालनपूर उप कारागृहात नेण्यात आले.

बुधवारी (27 मार्च) बनासकांठामधील पालनपूर येथील जिल्हा न्यायालयाने भट्ट यांना 28 वर्षे जुन्या खटल्यात दोषी ठरविले होते. या महिन्याच्या सुरुवातीला गुजरात उच्च न्यायालयाने भट्ट यांना कथित कोठडी प्रकरणातही जन्मठेपेची शिक्षा सुनावली होती.

नेमके प्रकरण काय?

संजीव भट्ट हे 13 ऑक्टोबर 1995 ते 18 ऑक्टोबर 1996 पर्यंत बनासकांठा जिल्ह्याचे पोलिस अधीक्षक (एसपी) म्हणून कार्यरत होते. 1996 मध्ये कथितरीत्या भट्ट यांच्या सूचनेनुसार, पोलिस निरीक्षक इंद्रवदन व्यास यांनी पालनपूरच्या हॉटेलवर छापा टाकला आणि हॉटेलमधील एका खोलीतून 1.15 किलो अफू जप्त केली. या प्रकरणात वकील सुमेरसिंह राजपुरोहित यांना अटक करण्यात आली. ऑक्टोबर 1996 मध्ये राजपुरोहित यांनी दंडाधिकाऱ्यांकडे तक्रार दाखल केली. भट्ट, व्यास आणि इतर अनेकांनी त्यांच्या खोलीत अफू ठेवून, त्यांना फसविल्याचा आरोप, दाखल केलेल्या तक्रारीत करण्यात आला.

Back to top button