‘आयकर’ प्रकरणी काँग्रेसला दिलासा नाहीच, उच्‍च न्‍यायालयाने याचिका फेटाळल्‍या | पुढारी

'आयकर' प्रकरणी काँग्रेसला दिलासा नाहीच, उच्‍च न्‍यायालयाने याचिका फेटाळल्‍या

पुढारी ऑनलाईन डेस्‍क : आयकर विभागाच्या पुनर्मूल्यांकन प्रक्रियेला आव्हान देणाऱ्या काँग्रेसच्या याचिका दिल्ली उच्च न्यायालयाने फेटाळल्या आहेत. न्यायालयाने 2014-15, 2015-16 आणि 2016- या आर्थिक वर्षांसाठी काँग्रेसविरोधात आयकर अधिकाऱ्यांनी सुरू केलेल्या कर पुनर्मूल्यांकन प्रक्रियेविरोधात पक्षाने दाखल केलेल्या याचिकांवर आपला आदेश राखून ठेवला होता. न्यायमूर्ती यशवंत वर्मा आणि पुरूषेंद्र कुमार कौरव यांच्या खंडपीठाने याचिका फेटाळल्‍याने काँग्रेसच्‍या पदरी पुन्‍हा एकदा निराशा पडली आहे.

न्यायमूर्ती यशवंत वर्मा आणि न्यायमूर्ती पुरुषेंद्र कुमार कौरव यांच्या खंडपीठाने ITAT आदेशात हस्तक्षेप करण्याचे कोणतेही कारण नसल्याचे मागील सुनावणीवेळी स्‍पष्‍ट केले होते.

काय आहे प्रकरण?

आयकर विभागाने13 फेब्रुवारी रोजी काँग्रेसला 105 कोटी रुपयांच्या थकबाकीच्या वसुलीसाठी नोटीस पाठवली होती. विभागाने काँग्रेसला 210 कोटींचा दंडही ठोठावला होता. यासोबतच काँग्रेसची बँक खातीही गोठवण्यात आली. आयकर विभागाच्‍या या कारवाईविरोधात काँग्रेसने याचिका दाखल केली होती, मात्र ही याचिका फेटाळण्यात आली होती.

काँग्रेसचा पुनर्मूल्यांकनाच्या कारवाईला विरोध

आयकर विभागाच्‍या पुनर्मूल्यांकन कारवाईला काँग्रेसने सातत्‍याने   विरोध केला आहे. पक्षाध्‍यक्ष मल्लिकार्जुन खर्गे म्हणाले हाेते की,  लोकसभा निवडणुकीची घोषणा झाली असून आमचे बँक खाते गोठवण्यात आले आहे. याचा अर्थ आम्हाला निवडणूक लढवण्यापासून रोखण्याचे प्रयत्न सुरू आहेत. हा प्रकार देशात लोकशाही नष्ट होत असल्‍याचे आणखी एक उदाहरण आहे.

 

Back to top button