पुढारी ऑनलाईन डेस्क : Former IPS Officer Sanjiv Bhatt : गुजरातचे माजी आयपीएस अधिकारी संजीव भट्ट यांना 28 वर्षे जुन्या पालनपूर एनडीपीएस प्रकरणात दोषी ठरवण्यात आले आहे. भट्ट यांना बुधवारी पालनपूर सत्र न्यायालयात हजर करण्यात आले. 1996 च्या या प्रकरणात, बनासकांठाचे तत्कालीन एसपी असलेल्या भट्ट यांच्यावर पालनपूरमधील हॉटेलमध्ये दीड किलो अफू ठेवून एका वकिलाला अंमली पदार्थाच्या प्रकरणात अडकवल्याचा आरोप होता.
सामाजिक कार्यकर्त्या तिस्ता सेटलवाड आणि गुजरातचे माजी पोलीस महासंचालक आर बी श्रीकुमार यांच्यासह संजीव भट्ट यांच्यावर 2002 च्या गुजरात दंगलीप्रकरणी पुरावे तयार केल्याचा आरोप आहे. 2002 च्या गुजरात दंगलीत गुजरातचे तत्कालीन मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांच्या भूमिकेवर आरोप करणारे प्रतिज्ञापत्र सर्वोच्च न्यायालयात दाखल केल्यावर भट्ट चर्चेत आले. विशेष तपास पथकाने हे आरोप फेटाळून लावले. भट्ट यांना 2011 मध्ये सेवेतून निलंबित करण्यात आले होते आणि ऑगस्ट 2015 मध्ये गृहमंत्रालयाने 'अनधिकृत अनुपस्थिती' साठी बडतर्फ केले होते.