Lok Sabha Election 2024 : भाजपचे लोकसभेसाठी आणखी 3 उमेदवार जाहीर, हिमाचल प्रदेश विधानसभा पोटनिवडणुकीसाठी 6 उमेदवारांची घोषणा | पुढारी

Lok Sabha Election 2024 : भाजपचे लोकसभेसाठी आणखी 3 उमेदवार जाहीर, हिमाचल प्रदेश विधानसभा पोटनिवडणुकीसाठी 6 उमेदवारांची घोषणा

नवी दिल्ली, पुढारी वृत्तसेवा : Lok Sabha Election 2024 : भाजपने आगामी लोकसभा निवडणुकीसाठी सहाव्या यादीत तीन उमेदवार जाहीर केले आहेत. राजस्थानमधील दोन तर मणिपूरमधील एक उमेदवार यामध्ये जाहीर करण्यात आले. तसेच हिमाचल प्रदेश विधानसभा पोटनिवडणुकीसाठी सहा उमेदवारांची घोषणा भाजपने केली आहे. हे सर्व सहाही उमेदवार काँग्रेसमधुन बंडखोरी करुन भाजपत सामिल झालेले नेते आहेत.

आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपने उमेदवार जाहीर करण्यात आघाडी घेतली. मंगळवारी भाजपने पुन्हा एक यादी जाहीर केली. यामध्ये राजस्थानच्या करौली ढोलपूरमधून इंदू देवी जाटव, दौसा मतदारसंघातून कन्हैया लाल मीणा यांना उमेदवारी देण्यात आली आहे. तर मणिपूरमधून थौनाआजम बसंत कुमार सिंह यांना उमेदवारी देण्यात आली आहे. सोबतच विविध राज्यांमध्ये होत असलेल्या विधानसभा पोट निवडणुकीच्या उमेदवारांची यादीही भाजपच्या वतीने जाहीर करण्यात आली आहे. गुजरात मधील चार, हिमाचल प्रदेशातील सहा, कर्नाटकमधील एक तर पश्चिम बंगालमधील दोन उमेदवार जाहीर केले आहेत.

काही दिवसांपूर्वी हिमाचल प्रदेशात राज्यसभेच्या एका जागेसाठी निवडणूक पार पडली. यात काँग्रेसच्या काही आमदारांनी भाजप उमेदवाराला मतदान केले होते. परिणामी काँग्रेस उमेदवार अभिषेक मनू सिंघवी यांना पराभवाचा सामना करावा लागला होता. त्यानंतर या सहा आमदारांना विधानसभा अध्यक्षांनी अपात्र घोषित करून त्यांचे सदस्यत्व रद्द केले. पुढे २३ मार्चला हे सहाही लोक भाजपमध्ये सामील झाले. सोबतच इतर तीन आमदारही भाजपमध्ये सामील झाले. आणि आता त्या ठिकाणी लागलेल्या विधानसभा पोटनिवडणुकीत भाजपने त्यांना उमेदवारी दिली आहे. १ जूनला हिमाचलमधील नऊ जागांवर पोटनिवडणूक होणार आहे. काँग्रेसच्या सहा बंडखोर नेत्यांपैकी सुधीर शर्मा यांना धर्मशाला विधानसभा मतदारसंघातून तर रवी ठाकूर यांना लाहौल व स्पितीमधून, राजेंद्र राणा यांना सुजाणपूरमधून, इंद्र दत्त लखनपाल यांना बडसरमधून, चैतन्य शर्मा यांना गगरेटमधून तर देवेंद्र कुमार यांना कुटलैहडमधून उमेदवारी देण्यात आली आहे. याच जागांवर हे नेते आमदार होते.

Back to top button