Lok Sabha Election 2024 | प्रचाराआधीच घसरली पातळी! येडियुराप्पा- ईश्वराप्पा एकमेकांशी भिडण्याचे कारण काय? | पुढारी

Lok Sabha Election 2024 | प्रचाराआधीच घसरली पातळी! येडियुराप्पा- ईश्वराप्पा एकमेकांशी भिडण्याचे कारण काय?

गोपाळ गावडा

येडियुराप्पा आणि ईश्वराप्पा हे दोघे कर्नाटकातील दोन दिग्गज नेते. दोघांच्याही नावात अप्पा हे एकच साम्य नाही, तर हे दोघेही भाजपचे कर्नाटकातले आधारस्तंभ. राष्ट्रपातळीवर जसे वाजपेयी-अडवाणी, तसे कर्नाटकात राज्य पातळीवर येडियुराप्पा-ईश्वराप्पा. इतकी त्यांची घनिष्ट मैत्री. पण तिला आता सुरुंग लागलाय तो पुत्रप्रेमाचा. (Lok Sabha Election 2024)

राजकारणात कोणी कुणाचा कायम मित्र किंवा कायम शत्रू नसतो, हे आता घासून घासून गुळगुळीत झालेले वाक्य. पण एकाच पक्षातले दोन दिग्गज नेते एकमेकांशी भिडत असतील तर? तेही असे नेते ज्यांनी पक्षाच्या वाढीसाठी एकाच सायकलवर डबल सीट बसून गावोगावी प्रचार केलेला आहे! हे दोन दिग्गज नेते म्हणजे येडियुराप्पा आणि ईश्वराप्पा. दोघांच्याही नावात अप्पा हे एकच साम्य नाही, तर हे दोघेही भाजपचे कर्नाटकातले आधारस्तंभ. राष्ट्रपातळीवर जसे वाजपेयी-अडवाणी, तसे कर्नाटकात राज्य पातळीवर येडियुराप्पा-ईश्वराप्पा. इतकी त्यांची घनिष्ट मैत्री. 1985 पासून या दोघांनी बंगळूरपासून बेळगावपर्यंत गावोगावी सायकलने फिरून पक्षाची बांधणी केलेली. त्यांच्या या बांधीलकीमुळेच दक्षिणेकडील चार राज्यांपैकी पहिल्यांदा कर्नाटकातच भाजप सत्तेवर आला.

भाजपकडे आलेले हे एकमेव दाक्षिणात्य राज्य. अर्थात या दोन्ही अप्पांच्या जोडीला एच. एन. अनंतकुमार, बी. एल. संतोष, जगदीश शेट्टर हे नेतेही होतेच; पण मदार सांभाळली होती ती या दोघांनीच. त्यांच्या कष्टाचे फळ म्हणून येडियुराप्पांना चार वेळा मुख्यमंत्रिपद लाभले, तर ईश्वराप्पाही तीनदा मंत्री आणि एकदा भाजपचे कर्नाटक प्रदेशाध्यक्ष बनले. पण पुत्रप्रेम भल्याभल्यांना चुकलेले नाही. त्या प्रेमापोटी कशाचाही बळी देण्यात नेते मागेपुढे बघत नाहीत. येडियुराप्पांनी पुत्रप्रेमापोटीच बंगळूरमधील भूखंडाचे आरक्षण उठवून मुख्यमंत्री असतानाच जेलची हवा खाल्ली. आता ईश्वरप्पांनी पुत्रप्रेमापोटी आपल्या या घनिष्ट मित्रावर म्हणजे येडियुराप्पांवर अतिशय खालच्या पातळीवर जाऊन टीका करताना चारित्र्यावरच शिंतोडे उडवले आहेत.

दोन वर्षांपूर्वी बेळगावच्या एका सरकारी विकासकामांच्या ठेकेदाराने ईश्वराप्पांवर 40 टक्के कमिशन मागितल्याचा आरोप करत आत्महत्या केली होती. त्यामुळे ईश्वराप्पांना ग्रामविकास मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा लागला होता. शिवाय त्यांनी त्यावेळीच पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या आवाहनावरून सक्रिय राजकारणातून निवृत्तीची घोषणा केली होती. त्या घोषणेमागे त्यांना ग्वाही मिळाली होती ती त्यांच्या मुलाला हावेरी लोकसभा मतदार संघातून लोकसभा उमेदवारीची. पण भाजपच्या पहिल्या यादीत हावेरीतून ईश्वराप्पांच्या मुलाला डावलण्यात आले आणि माजी मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांना उमेदवारी देण्यात आली.

उमेदवारी डावलण्यामागे येडियुराप्पांचा हात आहे, असे ईश्वराप्पांना वाटते. त्याला सबळ कारणही आहे. कारण ईश्वराप्पांचा मुलगा सध्या कुठेच नाही. मात्र, येडियुराप्पांचा एक मुलगा खासदार आहे, तर दुसरा मुलगा भाजपचा प्रदेशाध्यक्ष. म्हणजेच येडिंनी आपल्या मुलांचे बस्तान बसवून दिले आहे. पण ते ईश्वराप्पांना जमलेले नाही. ते मुद्दाम जमू दिले नाही, असे ईश्वराप्पांना वाटते. त्यातूनच त्यांनी येडिंच्या चारित्र्यावरच संशय व्यक्त केला आहे.

एका ज्येष्ठ नेत्याने दुसर्‍या दिग्गज नेत्यावर असे आरोप करणे राजकारणात नवे नाही. पण ते एकाच पक्षाच्या नेत्यांच्या बाबतीत घडणे म्हणजे अतीच. त्यातही भाजप या शिस्तप्रिय पक्षात घडणे दुर्मीळ. प्रचाराला तर अजून सुरुवातही झालेली नाही. आताच ही अवस्था असेल, तर येणार्‍या प्रचाराचा धुरळा काय काय रंग दाखणार, याची फक्त कल्पनाच आपण करू शकतो. (Lok Sabha Election 2024)

Back to top button