Arvind Kejriwal Arrest News | ‘तुरुंगात असलो तरी, माझ्या देशासाठी माझे जीवन समर्पित’; अटकेनंतर केजरीवालांची पहिली प्रतिक्रिया
पुढारी ऑनलाईन डेस्क: दिल्ली मद्य धोरण घोटाळा प्रकरणात ईडी (सक्तवसुली संचालनालय) दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना गुरुवारी रात्री अटक केली. यानंतर आज त्यांना राऊस ॲव्हेन्यू न्यायालयात हजर करण्यात आले. दरम्यान, 'मी तुरुंगात असो किंवा बाहेर, माझे जीवन हे माझ्या देशासाठी समर्पित आहे', अशी पहिली प्रतिक्रिया अटकेनंतर अरविंद केजरीवाल यांनी माध्यमांना दिली. या संदर्भातील वृत्त 'इंडिया टुडे' ने दिले आहे. (Arvind Kejriwal Arrest News)
ईडीकडून केजरीवालांच्या १० दिवसांच्या कोठडीची मागणी
केजरीवाल यांना गुरुवारी रात्री सक्तवसुली संचालनालयाकडून (ईडी) अटक करण्यात आली. आज शुक्रवारी त्यांना न्यायालयात हजर करण्यात आले. यावेळी मद्य धोरण घोटाळाप्रकरणी केजरीवाल यांच्या १० दिवसांची कोठडीची मागणी ईडीकडून करण्यात आली. गुरुवारी रात्री ९.०५ वाजता केजरीवाल यांना अटक करण्यात आली. त्यांच्या १० दिवसांच्या कोठडीसाठी अर्ज दिला आहे, असे अतिरिक्त सॉलिसिटर जनरल (ASG) एसव्ही राजू न्यायालयासमोर सांगितले. यावेळी राजू यांनी यावेळी सर्वोच्च न्यायालयाच्या सेंथिल बालाजी प्रकरणाच्या निकालाची प्रत न्यायालयाला दिली. त्यांनी निकालातील संबंधित परिच्छेद वाचून दाखवले. (Arvind Kejriwal Arrest News)
केजरीवाल मद्य धोरण घोटाळ्याचे सूत्रधार, ईडीचा दावा
दक्षिण ग्रुपला फायदा करून देण्याच्या बदल्यात केजरीवाल यांनी त्यांच्याकडून मोबदल्याची मागणी केली. त्यांना फायदा करून देण्याच्या बदल्यात केजरीवाल यांनी दक्षिण ग्रुपकडून मोबदल्याची मागणी केली. यातून सुमारे दक्षिण ग्रुपकडून मिळालेले ४५ कोटी आम आदमी पक्षाने गोव्यातील २०२१-२२ मधील प्रचारासाठी वापरले. चेन्नईहून आलेला पैसा व्हाया दिल्ली गोव्यात गेला. हा व्यवहार केवळ १०० कोटी रुपये नाही. ४५ कोटी रुपयांचा हवाला व्यवहार सापडला असून हे पैसे गोवा निवडणुकीदरम्यान प्रचारासाठी वापरले गेले, असा दावा एसव्ही राजू यांनी युक्तिवादादरम्यान केला. गोव्यातून मिळालेले पैसे चार मार्गांनी आल्याचे एका निवेदनातून समोर आल्याचेही त्यांनी निर्दशनासून आणून दिले. (Arvind Kejriwal Arrest News)
केजरीवाल यांच्या विरोधात पुरावा नाही, त्यांची अटक बेकायदेशीर- सिंघवी यांचा युक्तिवाद
केजरीवाल यांची बाजू मांडणारे वरिष्ठ वकील अभिषेक मनू सिंघवी म्हणाले की, केजरीवाल यांच्या विरोधात कोणताही थेट पुरावा नाही. सक्तवसुली संचालनालयाच्या ताब्यात असा कोणताही ठोस पुरावा नसताना, केजरीवाल यांना गुन्ह्यासाठी दोषी मानले जाऊ शकते का?. त्यांना ईडीने बेकायदेशीरपणे आणि मनमानीपणे अटक केली आहे. असे सिंघवी यांनी राऊस अव्हेन्यू न्यायालयात युक्तिवाद केला. केजरीवाल यांच्यासह चार प्रमुख नेत्यांना अटक झाली आहे. याचा अर्थ पहिले मतदान होण्यापूर्वी तुमच्याकडे निर्णय आहे, असेही ते म्हणाले. ज्येष्ठ वकील रमेश गुप्ता यांनीही केजरीवाल यांच्या बाजूने युक्तिवाद केला.