Lok Sabha Election 2024 : ओडिशात भाजप स्वतंत्र लढणार! बीजेडीसोबतच्या जागावाटपाची चर्चा निष्फळ | पुढारी

Lok Sabha Election 2024 : ओडिशात भाजप स्वतंत्र लढणार! बीजेडीसोबतच्या जागावाटपाची चर्चा निष्फळ

पुढारी ऑनलाईन डेस्क : भारतीय जनता पक्षाने ओडिशात लोकसभा आणि विधानसभा निवडणुका एकट्याने लढवण्याची घोषणा केली आहे. भाजपचे प्रदेशाध्यक्ष मनमोहन सामल यांनी शुक्रवारी एक्स पोस्टद्वारे ही माहिती दिली. ते म्हणाले की, ‘यावेळी भाजप लोकसभेच्या सर्व 21 आणि विधानसभेच्या सर्व 147 जागांवर स्वतंत्रपणे लढणार आहे.’

लोकसभा निवडणुकीच्या तारखा जाहीर झाल्या आहेत. सात टप्प्यात मतदान होणार आहे. त्यासाठी सर्वच पक्ष तयारीला लागले आहेत. युती आणि जागावाटपावर चर्चा सुरू आहे. दरम्यान, ओडिशामध्ये भाजप आणि बिजू जनता दल (बीजेडी) यांच्यात युती होऊ शकते, अशी चर्चा होती. याबाबत दोन्ही पक्षांमध्ये बराच वेळ चर्चा सुरू असल्याचे सांगण्यात आले. मात्र, आता भाजप आणि बीजेडीमध्ये एकत्र निवडणुका लढवण्याबाबत एकमत झाले नसल्याचे स्पष्ट झाले आहे.

मनमोहन सामल यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटले आहे की, ‘गेल्या 10 वर्षांपासून नवीन पटनायक यांच्या नेतृत्वाखाली ओडिशाचा बीजेडी पक्ष महत्त्वाच्या अनेक राष्ट्रीय मुद्द्यांवर केंद्रातील नरेंद्र मोदी सरकारला पाठिंबा देत आहे. त्याबद्दल आम्ही कृतज्ञता व्यक्त करतो. देशभरात जिथे जिथे दुहेरी इंजिनचे सरकार आले आहे तिथे विकासाच्या कामांना गती आली आहे, हे अनुभवावरून दिसून आले आहे. तसेच राज्याने प्रत्येक क्षेत्रात प्रगती केली आहे. पण आज मोदी सरकारच्या अनेक कल्याणकारी योजना ओडिशात पोहोचत नाहीत, त्यामुळे ओडिशातील गरीब भगिनी आणि बांधवांना त्याचा लाभ मिळत नाहीये,’ अशी टीका भाजपने बीजेडी सरकारवरही केली आहे.

‘ओडिशाची ओळख आणि ओडिशाच्या अभिमानाशी संबंधित प्रश्न’

भाजपचे प्रदेशाध्यक्ष पुढे म्हणाले, ओडिशा-अस्मिता, ओडिशा-गर्व आणि ओडिशाच्या लोकांच्या हिताशी संबंधित अनेक मुद्द्यांवर आम्हाला चिंता आहे. ओडिशामधील 4.5 कोटी लोकांच्या आशा, इच्छा आणि आकांक्षा पूर्ण करण्यासाठी, आपल्याला पंतप्रधान मोदींच्या दूरदर्शी नेतृत्वाखाली विकसित भारत आणि विकसित ओडिशा निर्माण करायचे आहे. यासाठी भारतीय जनता पक्ष यावेळी लोकसभेच्या सर्व 21 आणि विधानसभेच्या सर्व 147 जागांवर एकट्याने निवडणूक लढवणार आहे.’

Back to top button