नवी दिल्ली, पुढारी वृत्तसेवा : काँग्रेसच्या केंद्रीय निवडणूक समितीने महाराष्ट्रातील जवळपास 12 उमेदवारांच्या नावांवर शिक्कामोर्तब केले असून, त्यात कोल्हापूरमधून शाहू महाराज, पुण्यातून रवींद्र धंगेकर, सोलापूरमधून प्रणिती शिंदे, नांदेडमधून आ. वसंतराव चव्हाण यांच्या नावांचा समावेश आहे. गुरुवारी (दि. 21) मुंबईत महाविकास आघाडीची बैठक होणार असून, त्यात जागावाटपाचे सूत्र निश्चित होईल व काँग्रेस आपल्या 14 उमेदवारांच्या नावांची घोषणा करणार आहे. दरम्यान, सांगलीच्या जागेबाबत 'मविआ'मध्ये ओढाताण सुरूच असल्याने त्या जागेबाबत दिल्लीतील बैठकीत निर्णय झाला नसल्याचे सूत्रांनी सांगितले. (Loksabha Election)
आगामी लोकसभा निवडणुकीचे वेळापत्रक जाहीर झाले आहे. त्या पार्श्वभूमीवर विविध राजकीय पक्षांनी उमेदवार निश्चितीला वेग दिला आहे. असे असले तरी राज्यात मात्र भाजपने 20 उमेदवार जाहीर करून आघाडी घेतली आहे. राज्यातील काँग्रेसचे उमेदवार गुरुवारी जाहीर होण्याची शक्यता आहे. मात्र, त्यापूर्वी महाविकास आघाडीमधील जागावाटपाचे सूत्र अजून ठरलेले नाही. दरम्यान, काँग्रेसच्या केंद्रीय निवडणूक समितीची बुधवारी बैठक झाली. या बैठकीत काँग्रेसच्या सुमारे 12 उमेदवारांच्या नावांवर समितीने शिक्कामोर्तब केल्याचे सूत्रांनी स्पष्ट केले.
'वंचित' सोबत येणार का?
बुधवारी झालेल्या बैठकीत पहिल्या टप्प्यातील जवळपास सर्व जागांवरील नावे निश्चित झाली आहेत. रामटेकची जागा लढवण्यावर काँग्रेस ठाम असून, गुरुवारी मुंबईत होणार्या महाविकास आघाडीच्या बैठकीत त्या जागेची चर्चा होणार आहे. वंचित बहुजन आघाडी सोबत येणार का? हे निश्चित नसल्याने काँग्रेसने जर 'वंचित' सोबत आली नाही, तर अकोल्यातून अभय पाटील यांचे नाव निश्चित करून ठेवले आहे. (Loksabha Election)
बैठकीसाठी दिल्लीत असलेल्या प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले की, जागावाटपाचे सूत्र गुरुवारी मुंबईत जाहीर होणार आहे. तसेच मुंबईत आम्हाला तीन जागा लढायच्या होत्या; मात्र दोन जागांवरही आम्ही समाधानी आहोत, असेही नाना पटोले यांनी सांगितले. त्यामुळे काँग्रेसला मुंबईत दोन जागा मिळणार की एक? यासंदर्भात आज स्पष्टता मिळणार आहे.
वडेट्टीवार, पटोलेंना आग्रह
आजच्या बैठकीत पक्ष श्रेष्ठींनी प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी भंडारा-गोंदिया मतदारसंघातून निवडणूक लढवावी, अशी आग्रही भूमिका घेतली. तसेच चंद्रपुरात भाजपचे बडे नेते असलेल्या सुधीर मुनगंटीवार यांच्याविरोधात विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनीही निवडणूक लढवावी, अशी सूचना श्रेष्ठींनी केल्याचे समजते. दुसरीकडे, भिवंडी आणि सांगली या जागांवर काँग्रेसने दावा केला आहे. सांगलीत विशाल पाटील व भिवंडीत दयानंद चोरगे यांच्या नावासाठी काँग्रेस आग्रही आहे. या दोन जागांबाबत गुरुवारच्या बैठकीत निर्णय होणार आहे.
'ही' नावे निश्चित
शाहू महाराज (कोल्हापूर), रवींद्र धंगेकर (पुणे), प्रणिती शिंदे (सोलापूर), विकास ठाकरे (नागपूर), वसंतराव चव्हाण (नांदेड), नामदेव किरसांड (गडचिरोली), बळवंत वानखेडे (अमरावती), गोवाल पाडवी (नंदुरबार), डॉ. शिवाजी काळगे (लातूर), अभय पाटील (अकोला, 'वंचित' सोबत आघाडी न झाल्यास) ही नावे बुधवारी निश्चित करण्यात आली. सांगली, भंडारा-गोंदिया आणि चंद्रपूर या मतदारसंघांतील नावे निश्चित झालेली नाहीत.