दिल्ली जगातील सर्वाधिक प्रदूषित राजधानी | पुढारी

दिल्ली जगातील सर्वाधिक प्रदूषित राजधानी

नवी दिल्ली; वृत्तसंस्था : दिल्ली जगातील सर्वाधिक प्रदूषित राजधानी असल्याचे धक्कादायक वास्तव ‘वर्ल्ड एअर क्वॉलिटी रिपोर्ट’मधून समोर आले आहे; तर बिहारमधील बेगुसराय या महानगरातही प्रदूषणाने धोक्याची पातळी ओलांडली असल्याचे या अहवालात म्हटले आहे.

स्वित्झर्लंडमधील संस्थेेने जारी केलेल्या अहवालात म्हटले आहे की, हवा गुणवत्तेच्या निकषामध्ये बांगला देश आणि पाकिस्तानच्या पाठोपाठ भारत हा जगभरातील तिसरा सर्वाधिक प्रदूषित देश ठरला आहे. ‘वर्ल्ड एअर क्वॉलिटी रिपोर्ट 2023’च्या निष्कर्षांनुसार, 134 देशांच्या यादीत भारताचा प्रदूषित हवेच्या निकषावर तिसरा क्रमांक लागतो. त्याशिवाय जगभरातील सर्वाधिक प्रदूषित 50 शहरांमध्ये एकट्या भारतातील 42 शहरांचा समावेश आहे. भारतातील 96 टक्के लोकांना हवेच्या प्रदूषणाचा सामना करावा लागत असल्याचेही या अहवालात म्हटले आहे. दरम्यान, एकीकडे सर्वाधिक प्रदूषित देशांच्या यादीत भारत तिसर्‍या स्थानी असताना, दुसरीकडे सर्वाधिक प्रदूषित शहरांच्या यादीत भारतातल्या तब्बल 42 शहरांचा समावेश आहे. जगभरातील सर्वाधिक प्रदूषित शहर बिहारमधील बेगुसराय ठरले असून, त्यापाठोपाठ गुवाहाटी व दिल्ली या दोन शहरांचा अनुक्रमे दुसरा व तिसरा क्रमांक लागतो.

2023 मध्ये बेगुसरायमध्ये प्रतिक्युबिक मीटर पीएम 2.5 चे प्रमाण 118.9 मायक्रोग्रॅम इतके आढळून आले आहे. गेल्यावर्षी हेच प्रमाण तब्बल 19.7 इतके कमी होते. गुवाहाटीमध्ये हेच प्रमाण 2022 मधील 51 वरून 2023 मध्ये तब्बल 105.4 मायक्रोग्रॅम प्रतिक्युबिक मीटर इतके वाढल्याचे आढळून आले आहे. दिल्लीत हेच प्रमाण याच काळात 89.1 वरून 92.7 मायक्रोग्रॅम प्रतिक्युबिक मीटर इतके वाढल्याचे दिसून आले आहे.

जगात 9 मृत्यूंमागे एकाचा मृत्यू हवा प्रदूषणामुळे

हवेच्या प्रदूषणामुळे जगातील 9 मृत्यूंमागे एकाचा मृत्यू हवेच्या प्रदूषणामुळे होत असल्याचे चित्र आहे. जागतिक आरोग्य संघटनेच्या अहवालानुसार, हवेच्या प्रदूषणामुळे अस्थमा, कर्करोग, हृदयविकार आणि फुफ्फुसाच्या आजारांचा सामना करावा लागत आहे. यामुळे जगभरात वर्षाला 70 लाख जणांचा मृत्यू होत असल्याचेही या अहवालात नमूद केले आहे.

Back to top button