Lok Sabha Election Bihar: नाराजी नाट्यातून मोदी सरकारच्या मंत्र्यांचा राजीनामा | पुढारी

Lok Sabha Election Bihar: नाराजी नाट्यातून मोदी सरकारच्या मंत्र्यांचा राजीनामा

नवी दिल्ली: पुढारी वृत्तसेवा; राष्ट्रीय लोक जनशक्ती पक्षाचे प्रमुख पशुपती कुमार पारस यांनी मोदी सरकारमधील मंत्रीपदाचा राजीनामा दिला आहे. आपल्यावर अन्याय झाल्याचे कारण देत त्यांनी केंद्रीय मंत्रीपदाचा राजीनामा दिला. बिहारमध्ये राष्ट्रीय लोकशाही आघाडीच्या जागा वाटपात भाजपने चिराग पासवान यांच्या गटाला झुकते माप न दिल्यामुळे डावलले गेल्याची भावना झाल्याने पशुपतीकुमार पारस यांनी राजीनामा दिला आहे. (Lok Sabha Election Bihar)

पीएम मोदींच्या नेतृत्वाचे पशुपतीकुमार यांच्याकडून कौतुक

बिहारमधील जागा वाटपानंतरच्या नाराजी नाट्याच्या पार्श्वभूमीवर पशुपतीकुमार पारस यांनी आज (दि.१९) दिल्लीत पत्रकार परिषद घेऊन राजीनाम्याची घोषणा केली. आमच्यावर अन्याय झाला आहे, त्यामुळे मी केंद्रीय मंत्रिपदाचा राजीनामा देत असल्याचे ते म्हणाले. सोबत, पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वावर पशुपतीकुमार पारस यांनी स्तुतीसुमने उधळली. ते म्हणाले, की मी अत्यंत प्रामाणिकपणे देशाची सेवा केली आणि आजही मी पंतप्रधानांचा आभारी आहे. पंतप्रधान मोदी हे महान नेते आहेत. आमचे पाच खासदार असून, एनडीएमधील जागावाटपानंतर पुढील निर्णय घेतला जाईल; असे आपण आधीच सांगितले होते. त्यामुळे आपण राजीनामा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे पाठवला असल्याचे पशुपती पारस म्हणाले. (Lok Sabha Election Bihar)

भाजप १७ तर संयुक्त जनता दल १६ जागांवर लढणार

भाजपने काल बिहारमधील जागा वाटपावर शिक्कामोर्तब करताना चिराग पासवान यांच्या लोकजनशक्ती पक्षाला (रामविलास गट) पाच जागा सोडल्या आहेत. बिहारमध्ये भाजप १७ तर संयुक्त जनता दल १६ जागांवर लढणार आहे. याखेरीज जीतनराम मांझी यांचा अवाम मोर्चा (धर्मनिरपेक्ष), उपेंद्र कुशवाह यांचा राष्ट्रीय लोक मोर्चा प्रत्येकी एक जागा लढणार आहेत. यात पशुपतीकुमार पारस यांना एकही जागा सोडण्यात आली नसल्याने वाढलेल्या अस्वस्थेतून त्यांनी मंत्रीपदाचा राजीनामा दिला आहे. दरम्यान, राष्ट्रीय जनता दलाने पशुपतीकुमार पारस यांना विरोधकांच्या आघाडीत येण्याचा प्रस्ताव दिल्याचेही सांगितले जात आहे. (Lok Sabha Election Bihar)

हे ही वाचा:

Back to top button