आप खासदार संजय सिंह यांना अखेर राज्यसभा सदस्यत्वाची शपथ (video) | पुढारी

आप खासदार संजय सिंह यांना अखेर राज्यसभा सदस्यत्वाची शपथ (video)

नवी दिल्ली: पुढारी वृत्तसेवा : दिल्ली मद्य धोरण गैरव्यवहार प्रकरणात तुरुंगात असलेले आणि राज्यसभेवर दुसऱ्यांदा निवडून आलेले आम आदमी पक्षाचे नेते संजय सिंह यांना अखेर आज खासदारकीची शपथ देण्यात आली. न्यायालयाच्या आदेशानुसार खासदार संजय सिंह यांना आज संसद भवनात नेण्यात आले आणि उपराष्ट्रपती व राज्यसभा सभापती जगदीप धनखर यांच्या दालनात त्यांना शपथ देण्यात आली. राज्यसभा उपसभापती हरिवंश नारायण सिंह, राज्यसभेचे प्रशासकीय अधिकारी आणि संजय सिंह यांचे कुटुंबीय उपस्थित होते.

संबंधित बातम्या 

राज्यसभेच्या नुकत्याच झालेल्या निवडणुकादरम्यान दिल्लीतील तीन जागांवर आपचे संजयसिंह, एन डी. गुप्ता आणि स्वाती मालिवाल यांची बिनविरोध निवड झाली होती. यातील संजय सिंह आणि एन डी. गुप्ता दुसऱ्यांदा खासदार झाले होते. मात्र, मद्य धोरण गैरव्यवहार प्रकरणात ४ ऑक्टोबर २०२३ पासून तुरुंगात असलेल्या संजयसिंह यांना राज्यसभा खासदारकीची शपथ घेता आली नव्हती. या प्रकरणात विशेष न्यायालयाचे न्यायाधीश एम. के. नागपाल यांनी १६ मार्चला दिलेल्या आदेशानंतर संजय सिंह यांना खासदारकीची शपथ घेण्याची मुभा मिळाली.

न्या. नागपाल यांनी तिहार कारागृहाच्या अधिकाऱ्यांना संजय सिंह यांना पूर्ण सुरक्षेसह संसदेत नेण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार संजय सिंह यांना संसद भवनात नेण्यात आले. तेथे राज्यसभा सभापती जगदीप धनकड यांनी पद आणि गोपनियतेची शपथ दिली. यावेळी संजय सिंह यांच्या पत्नी अनिता सिंह या देखील उपस्थित होत्या. या शपथविधीबद्दल आनंद व्यक्त करताना त्या भावूक झाल्या होत्या.

Back to top button