५ वर्षांचा कार्यकाळ पूर्ण करणारे प्रमोद सावंत ठरले गाेव्याचे पहिले मुख्यमंत्री  | पुढारी

५ वर्षांचा कार्यकाळ पूर्ण करणारे प्रमोद सावंत ठरले गाेव्याचे पहिले मुख्यमंत्री 

पणजी : विठ्ठल गावडे पारवाडकर गोव्याला घटक राज्याचा दर्जा मिळाल्यानंतर सर्वाधिक काळ मुख्यमंत्रीपद भूषवण्याचा मान विद्यामान मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांना मिळाला आहे. मंगळवार दि.18 रोजी त्यांनी मुख्यमंत्रीपदाची सलग पाच वर्षे पुर्ण केली.
मे 1987 मध्ये गोव्याला राज्याचा दर्जा मिळाल्यापासून अनेक मुख्यमंत्री झाले, पण त्यातील एकाही मुख्यमंत्र्यांना सलग पाच वर्षे या पदावर राहणे जमले नव्हते. ती कामगिरी डॉ. सावंत यांनी करुन दाखवली आहे.

17 मार्च 2019 रोजी तत्कालीन मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांच्या निधनानंतर डॉ.सावंत यांनी 19 मार्च 2019 रोजी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. तीही साध्या पध्दतीने. कारण त्यांचे राजकीय गुरु असलेले पर्रीकर यांचे निधन झाले होते. राज्यात पर्रीकरांनंतर कोण गोव्याचा कारभार चालवील असा प्रश्न उपस्थित झालेला असतानाच दु:खाच्या प्रसंगी डॉ. सावंत यांनी मुख्यमंत्री पद स्विकारले. त्यानंतर दोन वर्षांनी झालेल्या 2022 च्या विधानसभा निवडणुकीत भारतीय जनता पक्षाला 20 जागांसह बहुमत मिळवून दिले. महत्वाचे म्हणजे डॉ. सावंत यांनी एकाही पक्षाशी युती न करता हे यश मिळवले होते. 2022 च्या विधासनभा निवडणुकीत बहुमत मिळाल्यानंतर 28 मार्च 2022 रोजी त्यांनी पुन्हा एकदा मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली. ते अद्याप मुख्यमंत्री म्हणून कार्यरत आहेत.

सध्या 40 सदस्यांच्या गोवा विधानसभेत भाजपकडे 28 आमदार असून मगोच्या दोन व तिन अपक्ष अशा एकूण 33 आमदारांचा डॉ. सावंत यांच्या सरकारला पाठिंबा आहे.

मनोहर पर्रीकर हे चारवेळा मुख्यमंत्री झाले. तर प्रा. लक्ष्मीकांत पार्सेकर यांनी 8 नोव्हेंबर 2014 ते 14 मार्च 2017 पर्यंत दोन वर्षे आणि तीन दिवस मुख्यमंत्री म्हणून काम केले.

30 मे 1987 रोजी गोव्याला राज्याचा दर्जा मिळाल्यानंतर काँग्रेसचे तत्कालीन मुख्यमंत्री प्रतापसिंह राणे 9 जानेवारी 1990 ते 27 मार्च 1990 पर्यंत या पदावर होते.

चर्चिल आलेमाओ हे 27 मार्च 1990 ते 14 एप्रिल 1990 पर्यंत 18 दिवस मुख्यमंत्री होते. लुईस प्रोत बार्बोसा 14 एप्रिल ते 14 डिसेंबर 1990 पर्यंत मुख्यमंत्री होते.

1990 च्या दशकात राणे, रवि नाईक, विल्फ्रेड डिसोझा, लुइझिन्हो फालेरो आणि फ्रान्सिस्को सार्डिन्हा यांनीही मुख्यमंत्री पद भुषवले तथापी त्यापैकी कुणालाच पाच वर्षांचा कार्यकाळ पूर्ण करता आला नाही.

पर्रीकरानाही जमले नाही

मनोहर पर्रीकर यांनी चार वेळा मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. मात्र, त्यांना त्यांचा कार्यकाळ पूर्ण करता आला नाही. 4 वर्षे 247 दिवस ते या पदावर होते.

पर्रीकर यांचा मुख्यमंत्रीपदाचा कार्यकाळ..

24 ऑक्टोबर 2000, ते 3 जून 2002
3 जून 2002 ते 2 फेब्रुवारी 2005.
9 मार्च 2012 ते 8 नोव्हेंबर 2014.
14 मार्च 2017 ते 17 मार्च 2019 पर्यंत.

काँग्रेसचे मुख्यमंत्री म्हणून दिगंबर कामत यांनी 8 जून 2007 ते 9 मार्च 2012 या कालावधीत त्यांचा कार्यकाळ पूर्ण केला होता. तथापि, गोवा विधानसभेच्या सार्वत्रिक निवडणुका 2012 मध्ये तीन महिने आधी जाहीर झाल्यामुळे ते चार वर्षे नऊ महिने या पदावर राहीले. डॉ. सावंत यांनी 19 मार्च 2019 रोजी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. त्यांनी पुन्हा एकदा 28 मार्च 2022 रोजी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली व पाच वर्षे पुर्ण केली.

हेही वाचा :

Back to top button