वयोवृद्ध, दिव्यांगांना घरातून मतदान करण्याची सुविधा | पुढारी

वयोवृद्ध, दिव्यांगांना घरातून मतदान करण्याची सुविधा

नवी दिल्ली; पीटीआय : 85 वर्षे पूर्ण झालेले वयोवृद्ध आणि 40 टक्क्यांहून अधिक अपंगत्व असणार्‍या व्यक्तींसाठी घरातून मतदान करण्याची सुविधा निवडणूक आयोगाने उपलब्ध करून दिली आहे.

मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांनी याबाबत घोषणा करताना सांगितले की, घरातून मतदान करण्याची सुविधा काही राज्यांतील निवडणुकांमध्ये सुरू करण्यात आली होती. लोकसभा निवडणुकीत देशात प्रथमच घरातून मतदानाची सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहे. ज्यांचे वय 85 वर्षे पूर्ण झाले असे नागरिक आणि ज्यांना 40 टक्क्यांहून अधिक अपंगत्व आहे अशा व्यक्तींसाठी घरातून मतदान करण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहे. 85 वर्षे पूर्ण झालेल्यांची संख्या देशात 85 लाख आहे. उमेदवारी अर्ज भरण्याआधी वयोवृद्धांना घरी 12 डीचा अर्ज पाठवून देण्यात येणार आहे. या अर्जावर त्यांनी घरातून मतदान करण्याचा पर्याय निवडायचा आहे. त्यानंतर मतदानादिवशी निवडणूक कर्मचारी आणि स्वयंसेवी संस्थांच्या प्रतिधिनीद्वारे घरी जाऊन त्यांचे मतदान घेण्यात येणार आहे. वयोवृद्ध आणि दिव्यांगांनी मतदान केंद्रावर येऊन मतदानाचा हक्क बजावण्याची इच्छा व्यक्त केल्यास त्यांच्यासाठी व्हीलचेअरसह तत्सम सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहेत.

Back to top button