

नवी दिल्ली; वृत्तसंस्था : अरुणाचल प्रदेश, आंध्र प्रदेश, ओडिशा आणि सिक्कीम या राज्यांतील विधानसभा निवडणुकाही लोकसभेसोबत होणार आहेत. सिक्कीम आणि अरुणाचल प्रदेशात पहिल्या टप्प्यात 19 एप्रिल रोजी मतदान होणार आहे. आंध्र प्रदेशमध्ये 13 मे रोजी मतदान होणार आहे. ओडिशामध्ये चार टप्प्यांत मतदान पार पडणार आहे. 13 मे, 20 मे, 25 मे आणि 1 जून असे चार टप्पे असणार आहेत. या चारही राज्यांतील निवडणुकांचा निकाल 4 जून रोजी लागणार आहे.
आंध्र प्रदेशात गेल्या विधानसभा निवडणुकीत वायएसआर काँग्रेसने 151 जागा जिंकून निर्विवाद विजय मिळविला होता. टीडीपी या पक्षाचा दारुण पराभव झाला होता. तारखा जाहीर होण्याच्या काही तास आधी वायएसआर काँगे्रसचे अध्यक्ष जगनमोहन रेड्डी यांनी विधानसभेच्या 175 जागांवरील उमेदवारांची यादी जाहीर केली. तसेच लोकसभेच्या 25 जागांवरही उमेदवार जाहीर केले. अरुणाचल प्रदेश आणि सिक्कीममध्ये उमेदवारी अर्ज भरण्याची अंतिम तारीख 27 मार्च आणि 28 मार्च ठेवण्यात आली आहे. ओडिशात उमेदवारी अर्ज भरण्याची अखेरची तारीख 14 मे आहे.