लोकसभा निवडणुकीचा बिगुल; महाराष्ट्रात 5, तर देशभरात 7 टप्प्यांत निवडणुका | पुढारी

लोकसभा निवडणुकीचा बिगुल; महाराष्ट्रात 5, तर देशभरात 7 टप्प्यांत निवडणुका

नवी दिल्ली; पुढारी वृत्तसेवा : लोकशाहीचे उगमस्थान तसेच जगातील सर्वात मोठी लोकशाही असलेल्या भारताच्या लोकसभा निवडणुकीचा बिगुल अखेर वाजला आहे. मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांनी शनिवारी दुपारी निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केला. गतवेळेप्रमाणे यावेळीही 7 टप्प्यांमध्ये ही निवडणूक पार पडणार आहे. यावेळी 19 एप्रिल, 26 एप्रिल, 7 मे, 13 मे, 20 मे, 25 मे व 1 जून असे मतदानाचे टप्पे असतील. महाराष्ट्रातील मतदान मात्र 5 टप्प्यांमध्ये होणार आहे. महाराष्ट्रातील 48 लोकसभा मतदारसंघांसाठी 19 एप्रिल, 26 एप्रिल, 7 मे, 13 मे, 20 मे असे टप्पे असतील. सर्व टप्पे आटोपल्यानंतर महाराष्ट्रासह संपूर्ण देशात एकाचवेळी 4 जून रोजी मतमोजणी होईल व निकाल लागेल.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना तिसरा कार्यकाळ प्राप्त होऊन ते पंडित जवाहरलाल नेहरूंच्या विक्रमाची बरोबरी करतात काय, ते हा निकाल ठरविणार आहे. स्वातंत्र्यानंतरच्या 76 वर्षांत नेहरूंनंतर कुठल्याही पंतप्रधानाला सलग तिसरा कार्यकाळ मिळालेला नाही.
देशात आता आचारसंहिता लागू झाली आहे. इथून पुढे सत्ता कोणाची असेल हे 4 जूननंतर कळेल… पुढे 6 जून रोजी 17 व्या लोकसभेचा कार्यकाळ संपणार आहे. यावेळी सर्वाधिक 102 जागांसाठीचे मतदान हे पहिल्याच टप्प्यात म्हणजे 19 एप्रिलला पार पडेल. सर्वात कमी 49 जागांसाठी पाचव्या टप्प्यात मतदान होईल. पत्रकार परिषदेला मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांच्यासह निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार, सुखबीरसिंह संधू उपस्थित होते.

देशातील मतदानाचे 7 टप्पे

1) 19 एप्रिलला पहिल्या टप्प्याचे मतदान, 102 जागा.
2) 26 एप्रिलला दुसर्‍या टप्प्याचे मतदान, 89 जागा.
3) 7 मे रोजी तिसर्‍या टप्प्याचे मतदान, 94 जागा.
4) 13 मे रोजी चौथ्या टप्प्याचे मतदान, 96 जागा.
5) 20 मे रोजी पाचव्या टप्प्याचे मतदान, 49 जागा.
6) 25 मे रोजी सहाव्या टप्प्याचे मतदान, 57 जागा.
7) 1 जूनला सातव्या टप्प्याचे मतदान, 57 जागा.

अरुणाचलसह 4 राज्यांत विधानसभा निवडणुका

लोकसभा निवडणुकीसोबतच सिक्कीम, अरुणाचल प्रदेश, आंध्र प्रदेश, ओडिशा या 4 राज्यांमध्ये विधानसभा निवडणुका आणि काही राज्यांमध्ये पोटनिवडणुका होतील. जम्मू व काश्मीरसाठी विधानसभेची निवडणूक मात्र लोकसभा निवडणुकीसोबत होणार नसल्याचे स्पष्ट झाले आहे. बिहार, गुजरात, हरियाणा, झारखंड, महाराष्ट्र, त्रिपुरा, उत्तर प्रदेश, पश्चिम बंगाल, तेलंगणा, हिमाचल प्रदेश, राजस्थान, कर्नाटक, तामिळनाडू या राज्यांमध्ये विधानसभेच्या पोटनिवडणुका होतील. काही दिवसांपूर्वी महाराष्ट्रातील कारंजा येथील भाजपचे आमदार गोवर्धन शर्मा यांचे निधन झाले होते. कारंजात पोटनिवडणूक होईल.

हेही महत्त्वाचे…

– 1 एप्रिलपर्यंतची मतदारयादी अद्ययावत.
– मतदाराने निवडणूक आयोगाकडे तक्रार केल्यानंतर 100 मिनिटांत दखल घेणार.
– उमेदवाराला गुन्हेगारी पार्श्वभूमी असल्यास तसे नमूद करावे लागेल.
– एकूण 1.5 कोटी कर्मचारी सुरक्षा व्यवस्थेत तैनात असतील.
– लोकसभा निवडणुकीत अफवा रोखण्यासाठी विशेष उपाययोजना, हिंसाचार रोखण्यासाठी प्रत्येक जिल्ह्यात नियंत्रण कक्ष.
– सर्व विमानतळांवर तपासणी होणार. सर्व चार्टर्ड विमानांचीही तपासणी होणार.
– हेलिकॉप्टर लँड झाल्यानंतर तपासणी होईल.
– राजकीय पक्षांनी सोशल मीडिया जबाबदारीने वापरण्याचा निवडणूक आयोगाचा सल्ला.
– निवडणूक यंत्रणा प्रत्येक मतदान केंद्रावर पोहोचणार.
– बँकांना पैशाचे ताळेबंद द्यावे लागतील.
– खोट्या बातम्यांविरुद्ध तातडीने कारवाई होणार, याबद्दल जागरूक राहण्याचे आवाहन.
– जात, धर्माच्या आधारावर प्रचार होणार नाही.
– राजकीय पक्षांनी स्टार प्रचारकांच्या याद्या बनवून ठेवाव्यात.

सर्व यंत्रणा सज्ज आहेत. राजकीय पक्षांसह विविध वृत्तसमूहांच्या संपादकांना मार्गदर्शक सूचना देण्यात आल्या आहेत. सोशल मीडियावरील आक्षेपार्ह पोस्टसंदर्भात तक्रार असल्यास त्यासंदर्भातील अधिकार राज्य निवडणूक आयोगांना देण्यात आले आहेत. निवडणुकीत बळाचा किंवा पैशाचा वापर होऊ दिला जाणार नाही.
– राजीव कुमार, निवडणूक आयुक्त

निवडणूक प्रक्रिया 12 एप्रिलपासून

उमेदवारी अर्ज दाखल करणे : शुक्रवार, दि. 12 एप्रिल
उमेदवारी दाखल करण्याचा शेवटचा दिवस : शुक्रवार, 19 एप्रिल
अर्जाची छाननी : शनिवार, दि. 20 एप्रिल
अर्ज मागेे घेण्याची शेवटची तारीख : सोमवार, दि. 22 एप्रिल
मतदान : मंगळवार, दि. 7 मे
मतमोजणी : मंगळवार, दि. 4 जून

Back to top button