Lok Sabha Election | काँग्रेसला पुन्हा धक्का; पंजाबच्या माजी मुख्यमंत्र्यांच्या पत्नी प्रनीत कौर भाजपमध्ये | पुढारी

Lok Sabha Election | काँग्रेसला पुन्हा धक्का; पंजाबच्या माजी मुख्यमंत्र्यांच्या पत्नी प्रनीत कौर भाजपमध्ये

पुढारी ऑनलाईन डेस्क : लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसला एका मागून एक धक्के बसत आहेत. तर भाजपची ताकद आणखी वाढताना दिसत आहे. दरम्यान, काँग्रेसच्या निलंबित खासदार आणि पंजाबचे माजी मुख्यमंत्री अमरिंदर सिंग यांच्या पत्नी प्रनीत कौर यांनी आज (दि.१४) दिल्लीत औपचारिकपणे भाजपमध्ये प्रवेश केला आहे, असे वृत्त ‘ANI’ या वृत्तसंस्थेने दिले आहे. (Lok Sabha Election)

कॅप्टन अमरिंदर सिंग आणि त्यांची मुलगी जय इंदर कौर यांच्यानंतर त्यांची पत्नी प्रनीत कौर, पंजाबच्या ‘रॉयल ​​सीट’ पटियाला येथून चार वेळा काँग्रेसच्या खासदार राहिल्या आहेत. प्रनीत कौर गेल्या २५ वर्षांपासून पटियाला लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवत आहेत. मात्र या लोकसभेला पटियाला मतदार संघातून कौर या भाजपच्या उमेदवार असू शकतात? गेल्या ३० वर्षात पटियाला मतदारसंघाच्या राजकीय इतिहासात यंदा पहिल्यांदाच भाजपचा उमेदवार या जागेवरून निवडणूक लढवणार आहे. (Lok Sabha Election)

2023 मध्ये काँग्रेसमधून निलंबित

८० वर्षीय प्रनीत यांचे वय निवडणुकांच्या विरोधात जात असले तरी, पटियाला जागेसाठी त्या भाजपच्या आघाडीच्या उमेदवार आहेत. पक्षविरोधी कारवायांमुळे प्रनीत यांना गेल्यावर्षी फेब्रुवारीमध्ये काँग्रेसमधून निलंबित करण्यात आले होते. त्या पहिल्यांदा १९९९मध्ये लोकसभेसाठी निवडून आल्या होत्या. त्यानंतर २००४, २००९ आणि २०१९ मध्ये पुन्हा निवडून आल्या. २०१४ मध्ये, त्यांचे पती कॅप्टन अमरिंदर सिंग यांनी त्यांच्याऐवजी लोकसभा निवडणूक लढवली होती. दरम्यान, देशात मोदी लाट असूनही अमृतसर संसदीय जागेवरून राज्यसभेतील तत्कालीन विरोधी पक्षनेते दिवंगत अरुण जेटली यांचा पराभव करत ते निवडून आले होते. २०१४ ते २०१७ दरम्यान त्या आमदार होत्या. २००९ ते ऑक्टोबर २०१२ या काळात त्या काँग्रेसच्या नेतृत्वाखालील यूपीए-२ सरकारमध्ये परराष्ट्र राज्यमंत्रीदेखील होत्या.

 

Back to top button