Haryana Floor Test : हरियाणाचे नूतन मुख्‍यमंत्री सैनींनी जिंकला विश्‍वासदर्शक ठराव

हरियाणाचे नूतन मुख्‍यमंत्री नायब सिंग सैनी यांनी आज (दि.१३मार्च) विधानसभेच्या एकदिवसीय अधिवेशनात विश्‍वासदर्शक ठराव जिंकला.
हरियाणाचे नूतन मुख्‍यमंत्री नायब सिंग सैनी यांनी आज (दि.१३मार्च) विधानसभेच्या एकदिवसीय अधिवेशनात विश्‍वासदर्शक ठराव जिंकला.

पुढारी ऑनलाईन डेस्‍क : हरियाणाचे नूतन मुख्‍यमंत्री नायब सिंग सैनी यांनी आज (दि.१३ मार्च) विधानसभेच्या एकदिवसीय अधिवेशनात आवाजी मतदानाने विश्‍वासदर्शक ठराव जिंकला. आपल्याकडे स्पष्ट बहुमत असल्याचा दावा त्‍यांनी केला होता. ४८ आमदारांचा आपल्‍या पाठिंबा असल्‍याचेही पत्रही त्‍यांनी राज्‍यापलांना दिले होते. ( Haryana Floor Test : New CM Nayab Singh Saini Prove Majority )

लोकसभा निवडणुकीतील जागा वाटपावरुन मंगळवारी (दि.१२मार्च) हरियाणातील भारतीय जनता पक्ष आणि जननायक जनता पक्ष युती अखेर तुटली. मुख्‍यमंत्रीपदाचा मनोहर लाल खट्टर यांनी राजीनामा दिला . यानंतर नायबसिंग सैनी यांनी मुख्‍यमंत्रीपदाची शपथ घेतली. सैनी यांच्‍यासह भाजप नेते कंवर पाल गुजर, भाजप नेते मूलचंद शर्मा, जय प्रकाश दलाल, बनवारी लाल यांच्‍यासह अपक्ष आमदार रणजित सिंह यांनीही हरियाणाच्या मंत्रिमंडळात मंत्रीपदाची शपथ घेतली होती. नूतन मुख्‍यमंत्री सैनी यांनी स्‍पष्‍ट केले होते की, भाजपच्या नेतृत्वाखालील सरकारला एकूण 48 आमदारांचा पाठिंबा आहे.

आज सकाळी हरियाणा विधानसभेच्‍या कामकाजाला सुरुवात झाली. नूतन मुख्‍यमंत्री नायब सिंग सैनी यांनी विश्‍वासदर्शक ठराव मांडला. यानंतर यावर चर्चा सुरु झाली. एक तास विरोधी पक्ष तर एक तास सत्ताधारी पक्षाच्‍या सदस्‍यांनी विश्‍वासदर्शक ठरावावर मते मांडण्‍याचा कालावधी निश्‍चित झाला.

Haryana Floor Test :'जजप'ने जारी केला व्हिप,पाच सदस्‍यांचा सभात्‍याग

हरियाणातील सैनी सरकारवरील विश्‍वासदर्शक ठरावापूर्वी जननायक जनता पार्टी (जजप) ने आपल्या आमदारांना विधानसभेत गैरहजर राहण्‍यासाठी व्हिप जारी केला. पक्षाने आमदारांना लिहिलेल्या पत्रात म्हटले आहे की, "हरियाणा विधानसभेतील जेजेपीच्या सर्व सदस्यांना 13 मार्च रोजी विश्वासदर्शक ठरावावर मतदानाच्या वेळी सभागृहातून सकारात्मकपणे अनुपस्थित राहण्याची विनंती केली जात आहे." विश्‍वासदर्शक ठरावाच्‍या मतदानापूर्वी जननायक जनता पक्षाचे ( जजप) आमदार जोगीराम सिहाग, देवेंद्र बबली, रामकुमार गौतम, रामनिवास सूरजखेडा, ईश्वर सिंह हेही बाहेर पडले. अपक्ष आमदार बलराज कुंडू यांनी सभागृहातून सभात्याग केला.

मुख्‍यमंत्री म्‍हणून सभागृहात येणे हे माझे भाग्‍य : नायब सिंग सैनी

सभागृहात विश्वासदर्शक ठरावावर झालेल्या चर्चेदरम्यान मुख्यमंत्री नायबसिंग सैनी म्‍हणाले की, मी एका सामान्‍य कुटुंबातून आलाे आहे. माझ्या कुटुंबात कोणीही राजकारणात नाही. मी फक्त भाजपचा कार्यकर्ता आहे.आज मला एवढी मोठी संधी मिळाली आहे. हे फक्त भाजपमध्‍येच शक्य आहे, असेही ते म्‍हणाले.मी मुख्यमंत्री म्हणून सभागृहात आलो हे माझे भाग्य आहे. मनोहर लाल यांच्या मार्गदर्शनामुळे माझी इथपर्यंत वाटचाल झाली आहे.

मालूम था सबको एक दिन यार बदलेंगे….

यावेळी माजी मुख्‍यमंत्री भूपेंद्र हुड्डा यांनी शायरीच्‍या माध्‍यमातून सत्ताधारांची फिरकी घेतली. "मालूम था सबको एक दिन यार बदलेंगे, नाटक वही रहेगा पर किरदार बदलेंगे।", असे सांगत तुम्ही मुख्यमंत्री बदलत राहा, आम्ही सरकार बदलू, असा दावा त्‍यांनी केला.

Haryana Floor Test : नीरज शर्मांच्‍या वक्तव्यावर गदारोळ

चर्चेदरम्यान काँग्रेस आमदार नीरज शर्मा यांनी अपक्ष आमदारांना गरीब असे संबोधले. या शब्दावर नयनपाल रावत यांनी आक्षेप घेतला, त्यानंतर शर्मा यांनी शब्द मागे घेतले. या वेळी रावत म्हणाले की, हे हुड्डा यांचे सरकार नाही जिथे 'एचजेके'च्‍या आमदारांना विकत घेऊन सरकार बनवले गेले. त्यावर विरोधी आमदार उभे राहिले आणि गोंधळाचे वातावरण निर्माण झाले. मंत्री कंवरपाल गुर्जर म्हणाले की, संपूर्ण हरियाणाला हे माहित आहे, यात शंका नाही. माजी मुख्यमंत्री भूपेंद्र हुड्डा उभे राहिले आणि म्हणाले की, लोकांना माहित आहे की मी आता बोलू आणि सत्य उघड करू? यानंतर सभापतींनी प्रकरण शांत केले.

मंत्री जयप्रकाश दलाल यांचा काँग्रेसवर निशाणा

या वेळी मंत्री जय प्रकाश दलाल म्हणाले की, आज एका गरीब शेतकऱ्याच्या घरात जन्मलेला मुलगा मुख्‍यमंत्री पदापर्यंत पोहचाला आहे. मला घराणेशाहीचे राजकारण करणाऱ्यांचे आश्चर्य वाटते. गुप्त मतदान व्हायला हवे, असे त्यांच्या सदस्यांचे म्हणणे आहे. काँग्रेसच्या लोकांनी मित्रांना जमवून दाखवले तर ते विश्वासदर्शक ठरावाच्या विरोधात आहेत असे म्हणता येईल. आमच्या सरकारने गरिबांच्या हातात सत्ता दिली आहे. शेतकऱ्यांच्या खात्यावर पैसे जमा झाले आहेत. मनोहर लाल आणखी उच्च पदावर जातील. माजी मुख्यमंत्री प्रामाणिक आणि नवे मुख्यमंत्री सभ्य असे वर्णन केल्याबद्दल मी माझ्या काँग्रेस सहकाऱ्यांचे आभार मानतो, असेही त्‍यांनी नमूद केले.

मनोहर लाल यांच्याबद्दल आम्हाला सहानुभूती : कादियान यांचा टोला

विश्‍वासदर्शक ठरावावरील चर्चेवेळी काँग्रेस आमदार रघुबीर कादियान म्हणाले की, 11 मार्च रोजी पंतप्रधान हरियाणात आले होते. यावेळी त्‍यांनी मनोहर लाल यांचे कौतुक केले. मात्र दुसर्‍याच दिवशी त्‍यांना मुख्‍यमंत्रीपद सोडावे लागले. त्याचा परिणाम जनतेवरही होतो. राजकीय पक्षाशी संबंधित असलेल्या व्होटबँकमध्ये सत्ताविरोधी भूमिका येते. मनोहरलाल अत्यंत अपमानस्‍पद प्रकारे मुख्‍यमंत्रीपदावरुन हाकलून देण्यात आले, द्रौपदीचीही एवढ्या प्रमाणात वस्त्रहरण झाली नाही. आम्हाला मनोहर लाल यांच्याबद्दल सहानुभूती आहे, असा टोलाही त्‍यांनी लगावला.

Haryana Floor Test : रातोरात संपूर्ण दृश्य बदलले : राव दान सिंह

राज्‍यात अशी काय आणीबाणीची परिस्‍थिती आली की, अचानक विश्वासदर्शक ठराव घेण्याची गरज आहे का, असा सवाल करत काँग्रेसचे आमदार राव दान सिंह म्‍हणाले की, 11 मार्च रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मनोहरलाल खट्‍टर यांचे कौतुक केले होते. तर यानंतर रातोरात संपूर्ण दृश्य बदलले. सरकारमध्ये काही त्रुटी राहिल्या असतील त्‍यामुळेच हे पाऊल उचलावे लागले. सरकारने आपली बिकट परिस्थिती लपवण्यासाठी हा बदल केला, असेही ते म्‍हणाले.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news