इलेक्ट्रोल बाँडची सर्व माहिती निवडणूक आयोगाला सादर; SCने झापल्यानंतर SBI ताळ्यावर | पुढारी

इलेक्ट्रोल बाँडची सर्व माहिती निवडणूक आयोगाला सादर; SCने झापल्यानंतर SBI ताळ्यावर

पुढारी ऑनलाईन डेस्क : सर्वोच्च न्यायालयाने झापल्यानंतर स्टेट बँक ऑफ इंडियाने इलेक्ट्रोल बाँडची सर्व माहिती मुख्य निवडणूक आयुक्तालयाकडे मंगळवारी (दि. १२) सायंकाळी सादर केली आहे. ही माहिती संकलित करून शुक्रवारी सायंकाळी पाच वाजेपर्यंत निवडणूक आयोगाच्या वेबसाईटवर उपलब्ध करून दिली जाणार आहे. पण स्टेट बँक ऑफ इंडियाच्या चेअरमननी यासंदर्भातील प्रतिज्ञापत्र अजून न्यायालयात सादर केलेले नाही.

या संदर्भातील प्रतिज्ञापत्र तयार असून ते लवकरच सादर केले जाईल, असे NDTVच्या वृत्तात म्हटले आहे. सर्वोच्च न्यायालयाने यापूर्वी ६ मार्चपर्यंत ही माहिती सादर करण्याचे आदेश स्टेट बँक ऑफ इंडियाला दिले होते. ही मुदतवाढ वाढवून देण्याची मागणी करणारी याचिक स्टेट बँक ऑफ इंडियाने सादर केली होती, त्यावर सोमवारी सुनावणी झाली. या सुनावणीत सरन्यायाधीश डी. वाय. चंद्रचुड यांनी स्टेट बँकची चांगलीच कानउघाडणी केली आणि ही माहिती मंगळवारीच सादर करण्याचे आदेश दिले. त्यानंतर स्टेट बँक ऑफ इंडियाने तातडीने ही माहिती मुख्य निवडणूक आयोगाला सादर केली आहे.

न्यायालयचा अवमान केल्याबद्दल कारवाई करण्याच्या मनःस्थितीत आम्ही नाही. पण आम्ही सांगू इच्छितो की जर या आदेशात दिलेल्या निर्देशांचे जाणीवपूर्वक उल्लंघन झाले तर तसा निर्णय आम्हाला घ्यावा लागले, असे सर्वोच्च न्यायालयाने म्हटले होते.

]इलेक्ट्रोल बाँडची माहिती ही स्वतंत्र ठेवलेली आहे, ती गोळा करण्यात, त्याची तपासणी करण्यात आणि त्याची गोपनीयता राखण्यात वेळ लागू शकतो, त्यामुळे ही माहिती सादर करण्यासाठी ३० जूनपर्यंत मुदतवाढ मिळावी अशी मागणी स्टेट बँक ऑफ इंडियाने केली होती. स्टेट बँक ऑफ इंडियाने मागितलेल्या मुदतवाढीच्या काळात लोकसभा निवडणुका होऊन गेल्या असत्या.

या सर्वोच्च न्यायालयाने स्टेट बँक ऑफ इंडियाला फटकारले. “तुमच्याकडे मुंबई शाखेत ही माहिती उपलब्ध आहे. तुम्हाला फक्त लिफाफे उघडून ही माहिती द्यायची आहे. ही माहिती संकलित करण्याबद्दल आम्ही काहीही सांगितलेले नाही,” अशा शब्दांत सर्वोच्च न्यायालयाने स्टेट बँक ऑफ इंडियाला खडेबोल सुनावले.  गेल्या महिन्या सर्वोच्च न्यायालयाने इलेक्ट्रोल बाँड असंवैधानिक असल्याचे म्हटले होते.

हेही वाचा

Back to top button