हरियाणात भाजपकडेच राहणार ‘सत्ता’, जाणून घ्या जागांचे गणित | पुढारी

हरियाणात भाजपकडेच राहणार 'सत्ता', जाणून घ्या जागांचे गणित

पुढारी ऑनलाईन डेस्‍क : लोकसभा निवडणुकीच्‍या तोंडावर हरियाणात आज राजकीय भूकंप आला. लोकसभा निवडणुकीतील जागा वाटपावरुन भारतीय जनता पक्ष आणि जननायक जनता पक्ष युती आज (दि.१२ मार्च) तुटली. मनोहर लाल खट्टर यांनी मुख्‍यमंत्रीपदाचा राजीनामा दिला. आता आज दुपारी राज्‍यात नव्या सरकारचा शपथविधी होणार आहे. नव्या सरकारमध्ये काही नव्या नावांचा समावेश झाल्याची चर्चा आहे. युती तुटली तरी हरियाणातील सत्ता भाजपकडेच राहणार आहे.

भाजप बहुमत कसे गाठणार?

हरियाणा विधानसभेत एकूण ९० जागा आहेत. भाजपचे ४१ आमदार आहेत. जननायक जनता पक्षाचे १० आमदार आहेत. सात अपक्षही भाजपसोबत आहेत. त्‍यामुळे राज्‍यातील भाजपची सत्ता अबाधित राहणार आहे. काँग्रेसचे ३० आमदार आणि INLD आणि हरियाणा लोकहित पक्षाचे प्रत्येकी एक आमदार याशिवाय सात अपक्ष आमदार आहेत. बहुमताचा आकडा ४६ आहे. जेजेपीसोबतची युती तोडल्यानंतर भाजपला स्वबळाचे ४१, सात अपक्ष आणि हरियाणा लोकहित पार्टीचा आमदारांचा पाठिंबा आहे. तसेज जननायक जनता पक्षाचे काही आमदार भाजपमध्‍ये प्रवेश करतील, अशीही शक्‍यता व्‍यक्‍त होत आहे.

‘भाजप-जजप’ युतीत मतभेदाचे कारण काय?

हरियाणामध्‍ये ऑक्‍टोबर २०१९ मध्‍ये विधानसभा निवडणूक झाली. भाजपने ९० पैकी ४० जागा जिंकल्‍या. बहुमतापासून वंजिच राहिल्‍याने अखेर १० आमदारांचे संख्‍याबळ असणार्‍या दुष्‍यंत चौटाला यांच्‍या जननायक जनता पक्षाबरोबर युती केली. दुष्‍यंत चौटाला हे उपमुख्‍यमंत्री झाले. चौटाला यांनी मंगळवार ११ मार्च रोजी भाजपचे राष्‍ट्रीय अध्‍यक्ष जेपी नड्डा यांच्याशी लोकसभा जागावाटपाची चर्चा केली. २०१९मध्‍ये भाजपने हरियाणातील लोकसभेच्‍या सर्व १० जागा जिंकल्‍या होत्‍या. आता आगामी लोकसभा निवडणूकही भाजप स्‍वबळावर लढण्‍याच्‍या तयारीत आहे;पण जजपने दोन जागांची मागणी केली होती.

हेही वाचा : 

 

 

Back to top button