मोठी बातमी : ‘भोजशाळा’ संकुलाच्‍या पुरातत्व सर्वेक्षणास उच्‍च न्‍यायालयाची परवानगी

1909 मध्ये  धार संस्थानाने भोजशाळेला संरक्षित स्मारक घोषित केले हाेते.
1909 मध्ये धार संस्थानाने भोजशाळेला संरक्षित स्मारक घोषित केले हाेते.

पुढारी ऑनलाईन डेस्‍क : मध्‍य प्रदेशमधील भोजशाळा मंदिर आणि कमल मौला मशीद संकुलाचे पुरातत्व सर्वेक्षण करण्‍यास इंदूर उच्‍च न्‍यायालयाच्‍या न्यायमूर्ती सुश्रुत अरविंद धर्माधिकारी आणि देवनारायण मिश्रा यांच्या खंडपीठाने परवानगी दिली आहे. तसेच भोजशाळा मंदिर आणि कमल मौला मशीद परिसराची संपूर्ण वैज्ञानिक तपासणी, सर्वेक्षण आणि उत्खनन करुन सहा आठवड्यांमध्‍ये अहवाल सादर करावा, असेही आपल्‍या आदेशात खंडपीठाने नमूद केल्‍याचे वृत्त 'ANI'ने दिले आहे.

खंडपीठाने आपल्‍या आदेशात म्‍हटलं आहे की, भोजशाळा मंदिर आणि कमल मौला मशीद संकुलाचे सर्वेक्षण करण्‍यासाठी भारतीय पुरातत्व विभागाचे महासंचालक किंवा अतिरिक्त महासंचालक यांच्या नेतृत्वाखाली ASI च्या पाच किंवा अधिक वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या तज्ञ समिती तयार करावी. त्‍यांनी सर्वेक्षणाचा योग्य कागदोपत्री अहवाल सहा आठवड्यांच्या आत न्यायालयात सादर करावा.

संकुलातील भूगर्भातील संरचनांचे कालावधी निश्चित करण्यासाठी कार्बन डेटिंग पद्धतीने सविस्तर वैज्ञानिक तपासणी केली जावी. प्रत्येक बाजूने नामनिर्देशित केलेल्या दोन प्रतिनिधींच्या उपस्थितीत सर्वेक्षणाच्या कार्यवाहीचे छायाचित्रण आणि व्हिडिओग्राफी करण्यात यावी, असेही न्‍यायालयाने आपल्‍या आदेशसात स्‍पष्‍ट केले आहे.

काय आहे 'भोजशाळा' वाद?

धार येथील भोजशाळेत सरस्वती देवीची मूर्ती बसवण्याची आणि संपूर्ण संकुलाची व्हिडिओग्राफी करण्याची मागणी करणारी याचिका इंदूर उच्च न्यायालयात दाखल करण्यात आली हाेती . तसेच येथील नमाज बंद करण्याची मागणीही याचिकेत करण्यात आली आहे.

इतिहास काय सांगतो?

हजार वर्षांपूर्वी धार येथे परमार घराण्याची सत्ता होती. राजा भोजने येथे 1000 ते 1055 पर्यंत राज्य केले. राजा भोज हे सरस्वती देवीचे निस्सीम भक्त होते. त्यांनी 1034 मध्ये येथे एक महाविद्यालय स्थापन केले, जे नंतर 'भोजशाळा' म्हणून ओळखले जाऊ लागले. हिंदूंनीही याला सरस्वती मंदिर मानले. 1305 मध्ये अलाउद्दीन खिलजीने भोजशाळा उद्‍ध्वस्त केल्याचे सांगितले जाते. यानंतर 1401 मध्ये, दिलावर खान गौरीने भोजशाळेच्या एका भागात मशीद बांधली. १५१४ मध्ये महमूद शाह खिलजीने दुसऱ्या भागातही मशीद बांधली.1875 मध्ये येथे उत्खनन झाल्याचे मानले जाते. या उत्खननात सरस्वती देवीची मूर्ती सापडली.  ब्रिटीश अधिकारी मेजर किनकेड याने ही मूर्ती इंग्‍लंडला नेली. सध्‍या ती लंडनच्या संग्रहालयात आहे. ती परत आणण्याची मागणीही हायकोर्टात दाखल याचिकेत करण्यात आली आहे.

हिंदू संघटना भोजशाळेचे वर्णन राजा भोज काळातील वास्तू म्हणून करतात आणि तिला सरस्वतीचे मंदिर मानतात. राजवंशाच्या काळात मुस्लिमांना काही काळ येथे नमाज अदा करण्याची परवानगी होती. दुसरीकडे, मुस्लिम समुदायाचे म्हणणे आहे की ते वर्षानुवर्षे येथे नमाज अदा करत आहेत. मुस्लिम त्याला भोजशाळा-कमल मौलाना मशीद म्हणतात.

धार संस्थानाने भोजशाळेला संरक्षित स्मारक घोषित केले

1909 मध्ये, धार संस्थानाने भोजशाळेला संरक्षित स्मारक घोषित केले. नंतर ते पुरातत्व विभागाकडे सुपूर्द करण्यात आले. त्याच्या देखभालीची जबाबदारी पुरातत्व विभागाची आहे. 1935 मध्ये धार संस्थानानेच येथे शुक्रवारी नमाज अदा करण्यास परवानगी दिली होती. 1995 मध्ये येथे वाद झाला होता. त्यानंतर मंगळवारी पूजा आणि शुक्रवारी नमाज अदा करण्यास परवानगी देण्यात आली.

तणावाच्‍या घटनांमुळे भोजशाळा चर्चेच्‍या केंद्रस्‍थानी

12 मे 1997 रोजी जिल्हाधिकाऱ्यांनी भोजशाळेत सर्वसामान्यांना येण्यास बंदी घातली. मंगळवारी पूजा करण्यासही बंदी घातली. वसंत पंचमीच्या दिवशीच नमाज आणि शुक्रवारी नमाज अदा करण्यास परवानगी देण्यात आली होती. ही बंदी 31 जुलै 1997 रोजी उठवण्यात आली. 6 फेब्रुवारी 1998 रोजी पुरातत्व विभागाने पुढील आदेश येईपर्यंत प्रवेशावर बंदी घातली. मंगळवारची पूजाही बंद झाली. 2003 मध्ये पुन्हा मंगळवारी पूजा करण्यास परवानगी देण्यात आली. बँक्वेट हॉलही पर्यटकांसाठी खुला करण्यात आला. 2013 मध्ये वसंत पंचमी आणि शुक्रवार एकाच दिवशी पडल्याने येथे तणाव निर्माण झाला होता. हिंदूंनी जागा सोडण्यास नकार दिला. पोलिसांनी लाठीमार केला. 2016 मध्येही असचा प्रकार घडला होता.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news