घटना बदलण्यासाठीच हव्यात 400 जागा : अनंत हेगडे | पुढारी

घटना बदलण्यासाठीच हव्यात 400 जागा : अनंत हेगडे

कारवार : वृत्तसंस्था :  राज्यघटना बदलण्यासाठी भाजपला 400 जागा हव्या आहेत, असे वादग्रस्त विधान भाजपचे खासदार अनंत हेगडे यांनी केल्याने नव्या वादाला तोंड फुटले आहे. कारवार येथे बोलताना त्यांनी हे विधान केले.

संबंधित बातम्या 

हेगडे म्हणाले की, राज्यघटनेत बदल करण्यासाठी संसदेच्या दोन्ही सभागृहांत दोन तृतीयांश बहुमताची आवश्यकता असते. काँग्रेसने विनाकारण केलेल्या दुरुस्त्या आणि मोडतोड हटवण्यासाठी पुरेसे संख्याबळ लागणार आहे. त्याशिवाय पक्षाला त्यासाठी 20 राज्यांत सत्ता असणे आवश्यक आहे. म्हणूनच 400 जागांचे लक्ष्य ठेवण्यात आले आहे.

हे करायचे असेल तर काँग्रेस लोकसभेत असायलाच नको आणि मोदी यांच्याकडे लोकसभेत दोन तृतीयांश बहुमत असायला हवे. 400 पेक्षा अधिक जागा का हव्यात हे सांगताना ते म्हणाले की, राज्यसभेत आम्हाला अजूनही दोन तृतीयांश बहुमत नाही. तेथे अगदी नावापुरते बहुमत आहे. त्यामुळे लोकसभेत 400 जागा आल्यावर राज्यसभेतही त्याचा परिणाम होईल आणि राज्यांतही भाजपचीच सत्ता येईल तेव्हा हा बहुमताचा प्रश्नच संपेल.

काँग्रेसची सडकून टीका

अनंत हेगडे यांच्या या विधानावर काँग्रेसने जोरदार हल्ला चढवला आहे. काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी हेगडे यांचे हे विधान म्हणजे पंतप्रधान मोदी आणि संघ परिवाराचा छुपा अजेंंडाच जगासमोर आणाला आहे, असे म्हटले आहे. पक्षाध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे म्हणाले की, देशात हुकूमशाही आणण्याचा संघ आणि मोदी यांचा अजेंडा पुन्हा उघड झाला आहे. मोदी सरकार, भाजप आणि संघ यांना देशात हुकूमशाही आणायची आहे. त्या माध्यमातून भारतीयांवर मनुवादी विचारधारा लादण्याचा त्यांचा डाव आहे. त्यातूनच मागासवर्गीयांचे हक्क हिरावून घ्यायचे आहेत, असा आरोपही त्यांनी केला.

Back to top button