ममतांचा खेला, चलो अकेला | पुढारी

ममतांचा खेला, चलो अकेला

कोलकाता, वृत्तसंस्था : पश्चिम बंगालच्या जागावाटपाकडे डोळे लावून बसलेल्या काँग्रेसला उडवून लावत तृणमूल काँग्रेसने ‘एकला चलो’ची हाक देतानाच सर्व 42 उमेदवारांची रविवारी नाट्यमय घोषणा केली. तसेच मेघालय व उत्तर प्रदेशातही उमेदवार उभे करण्याची घोषणा केली. यामुळे इंडिया आघाडीचे तडे आणखी विस्तारले गेले आहेत. तृणमूलच्या निर्णयाविरोधात काँग्रेसने टीका केली आहे; तर उमेदवारांच्या नावांवरून भाजपने टीकेचे बाण सोडले आहेत.

कोलकात्याच्या ब्रिगेड परेड मैदानावर रविवारी तृणमूलच्या नेत्या ममता बॅनर्जी यांची प्रचंड जाहीर सभा झाली. त्यात त्यांनी तृणमूल काँग्रेस स्वबळावर लोकसभा निवडणूक लढवण्याची घोषणा केली. त्यानंतर थेट बंगालमधील 42 उमेदवारांची नावे जाहीर केली. मैदानावर उभारण्यात आलेल्या भव्य रॅम्पवर या सर्व 42 उमेदवारांसोबत चालत ममता बॅनर्जी यांनी या उमेदवारांना जनतेसमोर सादर केले.

हे आहेत प्रमुख उमेदवार

कॅश फॉर क्वेरी प्रकरणात खासदारकी गमावलेल्या महुआ मोईत्रा यांना पुन्हा एकदा कृष्णापूर मतदारसंघातून तिकीट देण्यात आले आहे. सौगत रॉय, सुदीप बंडोपाध्याय यांना पुन्हा तिकीट देण्यात आले आहे. क्रिकेटपटू कीर्ती आझाद यांना बरद्वान दुर्गापूर येथून तर अभिनेता शत्रुघ्न सिन्हा यांना आसनसोल येथून उमेदवारी देण्यात आली आहे. काँग्रेस नेते अधीररंजन चौधरी यांचा बालेकिल्ला असलेल्या बेरहामपूरमधून भारताचा माजी क्रिकेटपटू युसूफ पठाण याला उमेदवारी देण्यात आली आहे. टीव्ही अभिनेत्री रचना बॅनर्जी यांना हुगळीतून, अभिनेत्री सयानी घोष यांना जादवपूर येथून तर हाजी नुरूल यांना बशीरहाट येथून तिकीट देण्यात आले आहे.

पाच उमेदवारांची तिकिटे कापली

तृणमूलच्या यादीतून पाच खासदारांना तिकिटे नाकारण्यात आली आहेत. त्यात अभिनेत्री मिमी चक्रवर्ती, नुसरत जहान, चौधरी मोहन जटुआ, अर्जुन सिंह यांची तिकिटे कापण्यात आली आहेत.

इंडिया आघाडीला मोठा हादरा

ममता बॅनर्जी यांच्या ‘एकला चलो रे’च्या भूमिकेमुळे इंडिया आघाडीला मोठा हादरा बसला आहे. आधी नितीशकुमारांनी अंग काढून घेतले व आता ममता बॅनर्जी यांनी. यामुळे इंडिया आघाडी बंगालपुरती संपुष्टात आली आहे. शिवाय मेघालय व उत्तर प्रदेशातही उमेदवार देण्याची घोषणा केल्याने त्या राज्यांतही अडचण निर्माण झाली आहे. प. बंगालमध्ये काँग्रेस पाच ते सात जागांवर अडून बसल्याने तृणमूलसोबतची चर्चा पुढे सरकूच शकली नाही. तृणमूलकडून काँग्रेसला फक्त दोन जागा देण्याची तयार होती. पण त्यावर काँग्रेस समाधानी नव्हती. तेव्हापासूनच तृणमूलने स्वबळाचा पुकारा सुरू केला होता. तो रविवारी प्रत्यक्षात आला.

Back to top button