Loksabha Election 2024 : भाजप, काँग्रेसची पहिली यादी जाहीर; राजकीय मैदानात कोण कुठे?

Loksabha Election 2024 : भाजप, काँग्रेसची पहिली यादी जाहीर; राजकीय मैदानात कोण कुठे?
Published on
Updated on

नवी दिल्ली, आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपने निवडणुकीची आचारसंहिता लागण्यापूर्वीच आपल्या १९५ उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली. यामध्ये अपेक्षेप्रमाणे पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्यासह लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला आणि ३४ मंत्री तसेच आणखी काही प्रमुख नेत्यांची नावे आहेत. ही यादी जाहीर करत असताना सर्व जात प्रवर्गातील, विविध राज्यांतील, महिलावर्ग, तरुण वर्ग, अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, ओबीसी, जुने, नवे, अनुभवी अशी सगळी समीकरणे भाजपने जुळवून आणली आहेत. या समीकरणासह एवढी मोठी यादी जाहीर करून भाजपने आपल्या मित्रपक्षांसह विरोधकांवरही एक प्रकारे दबाव तयार केला आहे. हा दबाव जेवढा विरोधकांसाठी आहे तेवढाच एनडीएमध्ये असलेल्या भाजपच्या मित्र पक्षांसाठी आहे. पंतप्रधानांसह काही केंद्रीय मंत्र्यांची नावे पहिल्या यादीत आल्यामुळे स्वाभाविकच भाजपचे टॉप टू बॉटम पदाधिकारी, कार्यकर्ते कामाला लागतील. (Loksabha Election 2024)

लवकरच भाजपची दुसरी यादी देखील येण्याची शक्यता आहे. पहिली यादी जाहीर करताना भाजप स्वतंत्रपणे ज्या राज्यात लढत आहे त्याच राज्यातील उमेदवारी जाहीर करण्याची खबरदारी भाजपने घेतली होती. मात्र, दुसऱ्या यादीतही भाजप हीच खबरदारी घेणार का, हा अर्थातच औत्सुक्याचा विषय असणार आहे. तसेच जिथे भाजपला नव्याने भर द्यायचा आहे, त्या दक्षिण भारतातल्या जागा भाजपने पहिल्या यादीत जाहीर केल्या नाहीत. भाजपची पहिली यादी जाहीर होत असताना आत्मविश्वास की अतिआत्मविश्वास हाही प्रश्न निर्माण होतो. आसाममध्ये मतदारसंघांची पुनर्रचना झाल्यामुळे बदललेले मतदारसंघ, अन्य राज्यांत उमेदवारी घोषित केलेल्या काही नेत्यांचे व्हायरल झालेले व्हिडीओ यामुळे काही नेत्यांची नावे बदलावी लागली. त्यामुळे उमेदवाराचे नाव घोषित केल्यानंतर अशी परिस्थिती येणे, हा अतिआत्मविश्वास आहे का या गोष्टीला वाव मिळतो. असे असले तरी भाजपने मोठी उमेदवारी यादी घोषित करून आघाडी घेतली आहे. या उलट इंडिया आघाडीमध्ये अजूनही बऱ्याच ठिकाणी चर्चा सुरू आहे.

भाजप पाठोपाठ काँग्रेसने ३९ उमेदवारांची पहिली यादी घोषित केली. काँग्रेस किंवा इंडिया आघाडीतील आणखी उमेदवारांची यादी तयार असेलही, मात्र त्यांची घोषणा केल्यानंतर त्या उमेदवारांवर भाजपचा दबाव येईल का आणि भाजप त्यांना फोडण्याचा प्रयत्न करेल, अशी भीती इंडिया आघाडीतील नेत्यांना असण्याची शक्यता आहे. राहुल गांधी यांची उमेदवारी वायनाडमधून जाहीर झाली असली तरी ते अमेठीतून लढणार की नाही, रायबरेलीतून कोण लढणार, यावर काँग्रेसकडून कुठलीही प्रतिक्रिया आली नाही. गांधी परिवाराने अमेठी, रायबरेलीतून लढण्याचा निर्णय घेतला नाही, तर कार्यकर्त्यांची मानसिकता नकारात्मक होऊ शकते.

Loksabha Election 2024 : इंडिया आघाडीकडे काय?

इंडिया आघाडी किंवा काँग्रेस पक्षाला भाजपविरुद्ध दोन हात करायचे असतील, तर तेवढ्याच ताकदीने मैदानात उतरणे आवश्यक आहे. यासाठी उमेदवारांची निवड, लोकसभा निवडणुकीसाठीचा जाहीरनामा आणि निवडणूक जिंकण्यासाठीची प्रचार रणनीती या गोष्टीवर लक्ष केंद्रित करावे लागणार आहे. कारण देशभरात भाजपचा उमेदवार कमळ आणि चेहरा पंतप्रधान नरेंद्र मोदी हे स्पष्ट असणार आहे. याविरुद्ध इंडिया आघाडीकडे काय, याचे उत्तर इंडिया आघाडीला शोधावे लागणार आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news