corona omicron : बातमी चिंता वाढवणारी, अफ्रिकेतून आलेल्या दोघांना कोरोनाची लागण, आरोग्य यंत्रणेची तारांबळ | पुढारी

corona omicron : बातमी चिंता वाढवणारी, अफ्रिकेतून आलेल्या दोघांना कोरोनाची लागण, आरोग्य यंत्रणेची तारांबळ

पुढारी ऑनलाईन डेस्क : देशभरात कोरोनाच्या तिसऱ्या लाटेची चाहूल लागली आहे. भारतात दक्षिण आफ्रिकेहून आलेले दोन प्रवासी कोरोना बाधित आढळले आहेत. बंगळुरुच्या केंपेगौडा आंतरराष्ट्रीय विमानतळावर तपासणीवेळी दोन प्रवासी कोरोना बाधित सापडले आहेत. यामुळे बंगळुरु विमानतळावर, आरोग्य यंत्रणेची मोठी तारांबळ उडाली होती. (corona omicron)

बंगळुरुच्या केंपेगौडा आंतरराष्ट्रीय विमानतळावर हे रुग्ण सापडल्याने बेंगळुरू ग्रामीण उपायुक्त के. श्रीनिवास याबाबत माहिती दिली. अफ्रिकेतून आलेल्या दोघांचा विमानतळावर स्वाब घेतल्यानंतर त्याची टेस्ट पॉझिटिव्ह आली आहे. पण नव्या कोरोना व्हायरसची, ओमीक्रॉनची लागण झाली आहे की नाही याचा कोणताही अहवाल आला नसल्याचे त्यांनी सांगितले.

या रुग्णांचा अहवाल येण्यासाठी ४८ तास लागणार आहेत. दोघांनाही क्वारंटाईन सेंटरमध्ये पाठविण्यात आले आहे. जोवर ते नव्या व्हेरिअंटने बाधित आहेत की नाहीत हे समोर येत नाही, तोवर त्यांना क्वारंटाईन सेंटरमध्येच ठेवले जाणार आहे, असे आरोग्य विभागाच्या अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले.

श्रीनिवास म्हणाले की, आतापर्यंत १० हाय रिस्क देशांमधून ५८४ प्रवासी बंगळुरुमध्ये दाखल झाले आहेत.

यापैकी ९४ प्रवासी हे एकट्या द. आफ्रिकेतून आलेले आहेत.

विमानतळावरील तपासणीच्या उपाययोजनांची पाहणी करण्यासाठी श्रीनिवास गेले होते.

corona omicron पंतप्रधान नरेंद्र मोदींना बोलावली तातडीची बैठक

दक्षिण आफ्रिकेत ‘ओमिक्रॉन’ (Omicron) या कोरोनाच्या नव्या व्हेरियंटचा धोका वाढलाय. या पार्श्वभूमीवर जागतिक आरोग्य संघटनेने (डब्ल्यूएचओ) शुक्रवारी तातडीची बैठक बोलावून अवघ्या जगाने सतर्कता बाळगावी, असा इशारा दिला.

या पार्श्वभूमीवर देशातील कोरोनाची परिस्थिती आणि लसीकरणाबाबत आढावा घेण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज शनिवारी सकाळी उच्चस्तरीय सरकारी अधिकार्‍यांची बैठक घेतली. या बैठकीला कॅबिनेट सचिव राजीव गौबा, पंतप्रधानांचे प्रधान सचिव पीके मिश्रा, केंद्रीय आरोग्य सचिव राजेश भूषण आणि नीती आयोगाचे सदस्य (आरोग्य) डॉ. व्ही के पॉल उपस्थित आहेत.

राज्यातही उपमुख्यमंत्री अजित पवारांची तातडीची बैठक

याबाबत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी प्रसारमाध्यमांना माहिती देताना सांगितले की, दक्षिण आफ्रिकेत आलेल्या कोरोनाच्या नव्या व्हेरियंटमुळे आंतरराष्ट्रीय विमानांबाबत काय करायचे त्याबद्दल केंद्र निर्णय घेणार आहे. त्या निर्णयाची आपल्याकडे अंमलबजावणी होईल.

प्रवाशांना विलगीकरणात अथवा इतर कोणती उपाययोजना करायची याबाबत योग्य ती कार्यवाही केंद्राच्या सुचनेनंतर केली जाणार आहे.

ओमिक्रॉन या नव्या व्हेरियंटमुळं गरज पडल्यास राज्यातही काही निर्बंध लावावे लागणार असल्याचे तज्ज्ञांचे मत आहे.

त्यामुळे सर्वांनी कोरोनाचे नियम कडकरित्या पाळावेत, असे आवाहन राज्य शासनाच्यावतीने करण्यात आले आहे.

ओमिक्रॉनची लक्षणे कोणती हे अद्याप स्‍पष्‍ट नाही

एका मराठी वृत्तवाहिनीशी बोलताना डॉ. रमण गंगाखेडकर ( Dr Raman Gangakhedkar) यांनी कोरोनाच्‍या नव्‍या व्‍हेरियंट आणि त्‍याच्‍या परिणामाबद्‍दल आपलं मत व्‍यक्‍त केले.

ते म्‍हणाले, दक्षिण आफ्रिकेतील नवा व्‍हेरियंटची भीती किती खरी आहे, याबाबत विचार होणे गरजेचे आहे.

ओमिक्रॉनची लक्षणे कोणती हे अद्‍याप स्‍पष्‍ट झालेले नाही.

या विषाणूचा संसर्ग झालेल्‍या रुग्‍णांमध्‍ये वेगळी लक्षणे दिसतात का, हेही कळालेली नाही.

तसेच त्‍याची तीव्रता, किती जणांना रुग्‍णालयात दाखल करावे लागले.

किती जणांचा मृत्‍यू झाला याबाबतही अद्‍याप ठोस माहिती नाही.

त्‍यामुळे आताच यावर खूप चर्चा करुन घाबरण्‍याचे कारण नाही.

जगभरात कोणत्‍याही देशात नवीन व्‍हेरिएंट दिसला की तत्‍काळ उपाययोजना केल्‍या जात आहेत, असेही त्‍यांनी सांगितले.

Back to top button