देशातील पहिल्या अंडरवॉटर मेट्रोचे पंतप्रधानांच्या हस्ते कोलकात्यात उद्घाटन | पुढारी

देशातील पहिल्या अंडरवॉटर मेट्रोचे पंतप्रधानांच्या हस्ते कोलकात्यात उद्घाटन

कोलकाता; वृत्तसंस्था : देशातील पहिल्या अंडरवॉटर मेट्रोचे (पाण्याखालून धावणार्‍या रेल्वेचे) उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते कोलकाता येथे बुधवारी दिमाखात झाले. कोलकात्यातील ही मेट्रो जमिनीपासून 33 मीटर खाली आणि हुगळी नदीच्या जलपातळीपासून 13 मीटर खाली बांधलेल्या ट्रॅकवर धावेल.

देशातील पहिली मेट्रो ट्रेन 1984 मध्ये कोलकाता उत्तर-दक्षिण कॉरिडोर (ब्ल्यू लाईन) मध्ये धावली. 40 वर्षांनंतर देशातील पहिली अंडरवॉटर मेट्रो रेल्वेही कोलकात्यातूनच सुरू झाली, हा एक योगायोगच. अंडरवॉटर मेट्रोसाठी हावडा स्टेशन ते महाकरण स्थानकापर्यंत 520 मीटर लांबीचा बोगदा तयार करण्यात आला आहे. दोन ट्रॅक त्यात आहेत. मेट्रो ट्रेन ताशी 80 कि.मी. या वेगाने केवळ 45 सेकंदांत हा बोगदा पार करेल. हावडा आणि कोलकाता अंतर त्यामुळे कमी झाले असून, दोन्ही शहरांची कनेक्टिव्हिटी सुधारली आहे. दररोज 7 ते 10 लाख लोकांचा प्रवास या सुविधेमुळे सोयीचा झाला आहे. 2017 मध्ये या अंडरवॉटर बोगद्याचे काम सुरू करण्यात आले होते.

जगातील सर्वात खोल हावडा मेट्रो स्टेशन

हावडा मैदानापासून पुढे 4.8 कि.मी.चा पाण्याखालील मेट्रो मार्ग तयार आहे. या मार्गावर हावडा मैदान, हावडा स्टेशन, महाकरण आणि एस्प्लेनेड हावडा स्टेशन ही 4 स्थानके आहेत. हावडा स्टेशन जमिनीपासून 30 मीटर खाली बांधलेले असून, ते जगातील सर्वात खोल मेट्रो स्टेशन आहे. सध्या, पाण्याखालील मेट्रो मार्ग जगात केवळ लंडन आणि पॅरिसमध्ये आहेत.

Back to top button