‘भारत हा देश नाही’, द्रमुकच्या खासदाराने वादग्रस्त विधान केल्याचा भाजपचा दावा | पुढारी

‘भारत हा देश नाही’, द्रमुकच्या खासदाराने वादग्रस्त विधान केल्याचा भाजपचा दावा

नवी दिल्ली, पुढारी वृत्तसेवा : द्रमुकचे खासदार ए. राजा (BJP vs A Raja) यांनी त्यांच्या भाषणात ‘आम्ही रामाचे शत्रू आहोत आणि भारत एक देश नाही’ असे म्हटल्याचा दावा भाजपने केला आहे. खासदार ए. राजा यांनी भाषणात प्रभु श्री रामाची खिल्ली उडवली आणि भारत देशाच्या अस्तित्वावरच प्रश्नचिन्ह उपस्थित केल्याचेही भाजपने म्हटले आहे. भाजप नेते अमित मालवीय यांनी एक्सवर ए. राजा यांचे एक कथित भाषण पोस्ट केले आहे. त्यावरून भाजपने खासदार ए. राजांसह इंडिया आघाडीचे कान टोचले आहेत.

भाजप नेते अमित मालवीय यांनी सोशल मीडिया साईट एक्सवर एक कथित व्हिडिओ पोस्ट केला आहे. या व्हिडिओमध्ये खासदार ए. राजा यांनी विविध दावे केले आहेत. या व्हिडिओचे भाषांतरही अमित मालवीय यांनी शेअर केले आहे. दरम्यान, या सगळ्या प्रकरणावर भाजप नेते रविशंकर प्रसाद यांनी मंगळवारी दिल्लीस्थित भाजप मुख्यालयात पत्रकार परिषद घेतली. या पत्रकार परिषदेमध्ये खासदार ए. राजा यांच्या वक्तव्यावर सडकून टीका केली आणि सोबतच इंडिया आघाडीवरही जोरदार टीकास्त्र सोडले.

भारतीय संस्कृती आणि संस्कारांना सार्वजनिकपणे उध्वस्त करणे, हा विरोधी पक्षांचा राजकीय अजेंडा आहे का? तसेच काँग्रेससोबत आघाडीत असलेल्या पक्षांकडून केलेले वक्तव्य काँग्रेसला पटतात का? असाही प्रश्न त्यांनी काँग्रेसला विचारला. दरम्यान, यापूर्वी अशाच प्रकारचे वक्तव्य स्टॅलिन यांनीही केले होते, असेही रविशंकर प्रसाद म्हणाले. विरोधी पक्षांनी हिंदू देवी-देवतांबद्दल, हिंदू संस्कृती विषयी असलेल्या भावनांना अशा प्रकारे अपमानित करू नये, असेही ते म्हणाले.

2014 ला विरोधी पक्षांचा दारुण पराभव झाला. 2019 ला त्याही पेक्षा मोठा पराभव झाला. 2024 ला तर अस्तित्वही राहणार नाही, त्याकडे विरोधी पक्षांनी लक्ष दिले पाहिजे, असा टोलाही लगावला. लालूप्रसाद यादव यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर केलेल्या टीकेवरून त्यांनी लालूप्रसाद यादवांवर टीकेची झोड उठवली. कर्पुरी ठाकूर, राम मनोहर लोहिया यांचा आदर्श सांगताना त्यांच्याकडून हेच शिकले का? असा खोचक सवालही रविशंकर प्रसाद यांनी विचारला.

अमित मालवीय यांनी पोस्ट केलेल्या व्हिडीओमध्ये काय?

द्रमुकचे खासदार ए. राजा यांच्या एका भाषणाचा व्हिडिओ अमित मालवीय यांनी पोस्ट केला आहे. त्या व्हिडिओमध्ये त्यांनी केलेल्या भाषणाचे हे भाषांतर अमित मालवीय यांनी पोस्ट केले आहे. त्यानुसार ए. राजा म्हणाले की, ‘भारत हे एक राष्ट्र नाही. हे नीट समजून घ्या. एक राष्ट्र म्हणजे एक भाषा, एक परंपरा आणि एक संस्कृती. तरच ते एक राष्ट्र आहे. भारत हे राष्ट्र नसून एक उपखंड आहे. तमिळ एक राष्ट्र आणि एक देश आहे. मल्याळम एक भाषा, एक राष्ट्र आणि एक देश आहे. ही सर्व राष्ट्रे भारत बनवतात. म्हणून, भारत हा एक देश नाही, तो एक उपखंड आहे. अनेक परंपरा आणि संस्कृती आहेत. जर तुम्ही तामिळनाडूत आलात तर एक संस्कृती आहे. केरळमध्ये दुसरी संस्कृती आहे. दिल्लीत दुसरी संस्कृती आहे, मणिपूरमध्ये कुत्र्याचे मांस खातात. होय, हे खरे आहे, ते खातात. ही एक संस्कृती आहे. यात काहीही चुकीचे नाही. हे सर्व आपल्या मनात आहे.’

Back to top button