सारे भारतीय माझे कुटुंब : पंतप्रधान मोदी यांचे विरोधकांना प्रत्युत्तर | पुढारी

सारे भारतीय माझे कुटुंब : पंतप्रधान मोदी यांचे विरोधकांना प्रत्युत्तर

।अदिलाबाद; वृत्तसंस्था : देशातील 140 कोटी भारतीय हेच माझे कुुटुंब आहे, अशा शब्दांत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोमवारी राष्ट्रीय जनता दलाचे नेते लालूप्रसाद यादव यांच्यासह विरोधकांच्या टीकेला प्रत्युत्तर दिले.

तेलंगणातील एका सभेत बोलताना त्यांनी काँग्रेस, राजदसह अन्य पक्षांच्या घराणेशाहीच्या मुद्द्यावर निशाणा साधला. लालूप्रसाद यादव यांनी पंतप्रधान मोदी यांच्यावर त्यांना कुटुंब नसल्याची बोचरी टीका केली होती. यावर बोलताना मोदी म्हणाले की, विरोधकांचे चेहरे वेगवेगळे आहेत. मात्र, खोटे बोलणे आणि लूटमार हीच त्यांची रणनीती आहे. अद्याप निवडणूक जाहीर झालेली नाही. त्यामुळे राजकीय स्वार्थासाठी सभा घेतल्या जात असल्याचा विरोधकांचा आरोप निरर्थक आहे. 2014 पासून आम्ही तेलंगणाच्या विकासासाठी निधी देत आहोत, असेही त्यांनी यावेळी निदर्शनास आणून दिले. भ्रष्टाचाराच्या माध्यमातून विरोधकांनी देशाच्या तिजोरीवर डल्ला मारला, अशा शब्दांत त्यांनी विरोधकांवर हल्लाबोल केला. तेलंगणात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते 56 हजार कोटींच्या प्रकल्पांचे उद्घाटन करण्यात आले.

आदिवासींसाठी स्वतंत्र मंत्रालय

आदिवासी समुदायासाठी केंद्र सरकारने स्वतंत्र मंत्रालयाची व्यवस्था केली असल्याची माहिती मोदी यांनी यावेळी दिली. आदिवासी समुदायातील महिला देशाच्या राष्ट्रपती होतील, याची कुणी कल्पनाही केली नसेल. मात्र, आम्ही आदिवासी महिलेस ती संधी दिली आहे, असे त्यांनी सांगितले.

Back to top button