Ajit Pawar NCP : अजितदादांची ‘राष्ट्रवादी’ अरुणाचल प्रदेश विधानसभा निवडणूक लढणार | पुढारी

Ajit Pawar NCP : अजितदादांची ‘राष्ट्रवादी’ अरुणाचल प्रदेश विधानसभा निवडणूक लढणार

नवी दिल्ली, पुढारी वृत्तसेवा : राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजित पवार गट आता आपला मोर्चा महाराष्ट्राबाहेरही वळवण्याच्या प्रयत्नात आहे. पुर्वोत्तर भारतात आगामी लोकसभेसह अरुणाचल प्रदेश आणि काही राज्यातील विधानसभा निवडणुका लढवणार असल्याची घोषणा आज अजित पवार गटाच्या वतीने करण्यात आली. अरुणाचल प्रदेशात लोकसभेसाठी केंद्रीय मंत्री किरेण रिजिजू यांची उमेदवारी भाजपने घोषित केली आहे. असे असतानाही अजित पवार गट निवडणूक लढण्यास इच्छुक आहे. यानिमित्ताने अजित पवार गट पक्षाचा राष्ट्रीय दर्जा मिळवण्याचा प्रयत्न करणार आहे.

राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजित पवार गटाच्या दिल्लीस्थित कार्यालयात पक्षाचे सरचिटणीस आणि माजी केंद्रीय मंत्री सुबोध मोहिते यांनी पत्रकार परिषद घेतली. यावेळी बोलताना ते म्हणाले की, राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्ष मागच्या 25 वर्षांपासून देशात काम करत आहे. जात, धर्म, भाषेवर आधारित आमचा पक्ष काम करत नाही तर विकासावर काम करतो. आगामी लोकसभेसोबतच अरुणाचल प्रदेशची विधानसभा निवडणूक होणार आहे. यामध्ये पूर्ण ताकदीने अरुणाचल प्रदेशात निवडणूक लढणार आहोत. आजच्या बैठकीत अरुणाचल प्रदेश विधानसभेतील 30 जागांवर चर्चा करण्यात आली. यातील 18 ते 20 आमदार निवडून आणण्यासाठी आम्ही काम करणार आहोत, असेही ते म्हणाले.

अजित पवार गट अरुणाचल प्रदेशमधील लोकसभेच्या 2 जागा लढण्यास इच्छुक असल्याचेही ते म्हणाले. दरम्यान, अरुणाचल प्रदेशच्या एका मतदारसंघातून पुर्वीच भाजपने किरण रिजेजु यांना उमेदवारी दिली आहे. त्यामुळे खरच अजित गट लोकसभा निवडणूक लढणार का हा प्रश्न आहे. अजित पवार गटाच्या स्थानिक नेत्यांचा या जागेसाठी आग्रह आहे. मात्र यावर अंतिम निर्णय पक्षश्रेष्ठी निर्णय घेणार असल्याचे सुबोध मोहिते म्हणाले.

Back to top button