त्वचादानामुळे मिळणार अनेकांना जीवदान! | पुढारी

त्वचादानामुळे मिळणार अनेकांना जीवदान!

भोपाळ/मुंबई, वृत्तसंस्था : महाराष्ट्र राज्याचे वैद्यकीय शिक्षणमंत्री हसन मुश्रीफ यांनी प्रत्येक जिल्ह्यात त्वचा स्वीकार केंद्र स्थापन करण्याची नुकतीच घोषणा केली आहे. दुसरीकडे, त्वचादानाबद्दल समाजात जागरूकतेचा प्रचंड अभाव आहे. त्वचादानामुळे एखाद्याला जीवन मिळू शकते, त्याचे जगणेही सुलभ होऊ शकते. वाढत्या दुर्घटनांमुळे त्वचादान हा अलीकडच्या काळात कळीचा मुद्दा बनलेला आहे.

भोपाळमधील ही घटना बघा. चित्रांश (वय 7) छतावर लोखंडी सळई हवेत फिरवत खेळत होता. हाय टेन्शन वायरला या सळईचा स्पर्श झाला आणि चित्रांश गंभीररीत्या भाजला. चित्रांश 60 टक्के भाजलेला होता. त्याच्या जखमांवर आधी त्याच्याच शरीराच्या त्वचेचा वापर करून ग्राफ्टिंग करण्यात आले; पण तो जास्त भाजलेला असल्याने त्याची त्वचा ग्राफ्टिंगसाठी पुरेशी नव्हती. चित्रांशच्या वडिलांनी मग त्वचादान केले. त्यांच्या एका पायाची त्वचा चित्रांशच्या  जखमांवरील ग्राफ्टिंगसाठी वापरण्यात आली.

भाजल्याने नष्ट झालेल्या त्वचेतून जीवाणू शरीरात प्रवेश करतात आणि संसर्ग होतो. त्यामुळे रुग्णाला मृत्यूही ओढवू शकतो. त्वचादान हे म्हणूनच जीवदानही आहे.

त्वचा संकलनाचे कार्य करणार्‍या स्किन बँकांचे प्रमाण भारतात अत्यंत कमी आहे. जेथे स्किन बँका नाहीत, तेथेच जिवंत व्यक्तीला त्वचादान करता येते, हे येथे महत्त्वाचे.

त्वचेत दोन थर असतात. वरचा थर प्रत्यारोपणासाठी काढला जातो. यकृत किंवा मूत्रपिंड प्रत्यारोपणात रुग्ण आणि दात्याचे टिश्यू मॅच केले जातात् पण त्वचेच्या प्रत्यारोपणात याची गरज नसते, हेही येथे महत्त्वाचे!

त्वचादान कोण करू शकते?

मृत व्यक्तीची त्वचा दान करता येते.
मृत्यूनंतर 6 ते 8 तासांपर्यंत त्वचादान शक्य आहे.
त्वचादान करणार्‍या व्यक्तीचे वय 18 वर असावे.
त्वचादात्यास त्वचाविकार, एचआयव्ही, हेपॅटायटिस बी आणि सी असू नये.
स्किन बँक नाही, अशा ठिकाणी जिवंत व्यक्तीही त्वचादान करू शकते.

आकडे बोलतात

10 लाख लोक भारतात दरवर्षी भाजण्याच्या घटनेचे बळी ठरतात.
27 स्किन बँक भारतात आतापर्यंत सुरू झाल्या आहेत.
4 ते 6 अंश सेल्सिअसमध्ये ग्लिसरॉल या रसायनाद्वारे त्वचेवर 45 दिवस प्रक्रिया स्किन बँकेत केली जाते.
5 वर्षांपर्यंत त्वचा स्किन बँकेत वापरासाठी तत्पर ठेवली जाऊ शकते.
100 वर्षांची व्यक्तीही त्वचादान करू शकते.

Back to top button