पुढारी ऑनलाईन डेस्क : CBI vs Akhilesh Yadav : लोकसभा निवडणुकीपूर्वी उत्तर प्रदेशचे माजी मुख्यमंत्री आणि सपा प्रमुख अखिलेश यादव यांच्या अडचणीत वाढ होण्याची दाट शक्यता आहे. केंद्रीय तपास यंत्रणा सीबीआयने अखिलेश यांना हमीरपूरमधील बेकायदा खाणकामाशी संबंधित एका प्रकरणात CRPC कलम 160 अंतर्गत समन्स पाठवल्याचे समोर आले आहे. त्यांना उद्या म्हणजेच 29 फेब्रुवारी रोजी दिल्लीत सीबीआयसमोर साक्षीदार म्हणून हजर राहण्याचे सांगण्यात आले आहे.
अखिलेश यादव यांना उत्तर देण्यासाठी सीबीआयसमोर हजर राहावे लागेल, असे समन्समध्ये नमूद करण्यात आले आहे. अखिलेश यांना जानेवारी 2019 मध्ये दाखल केलेल्या सीबीआय एफआयआरच्या संदर्भात समन्स बजावण्यात आले आहे, जे 2012-2016 दरम्यान हमीरपूरमधील कथित बेकायदेशीर खाणकामाशी संबंधित आहे. हमीरपूरमध्ये गौण खनिजांच्या बेकायदेशीर उत्खननाला परवानगी दिल्याप्रकरणी अज्ञात लोकसेवकांसह अकरा जणांची नावे एफआयआरमध्ये नोंदवण्यात आली आहेत.
जानेवारी 2019 मध्ये तत्कालीन जिल्हा दंडाधिकारी, खाण अधिकारी आणि इतरांसह अनेक लोकसेवकांविरुद्ध एफआयआर नोंदवण्यात आला होता. एफआयआरमध्ये सरकारी कर्मचाऱ्यांनी हमीरपूरमध्ये बेकायदेशीर खनिज उत्खननाला परवानगी दिल्याचा आरोप करण्यात आला होता. एफआयआरमध्ये नमूद करण्यात आले आहे की, सरकारी कर्मचाऱ्यांनी गुन्हेगारी कटात निविदा प्रक्रियेचे पालन केले नाही. गौण खनिजांची चोरी आणि पैसे उकळण्यासही परवानगी देण्यात आल्याचा आरोप करण्यात आला होता.