जेलमध्ये 270 हून अधिक महिला कैद्यांवर बलात्कार; राष्ट्रीय गुन्हे रेकॉर्ड ब्यूरोचा अहवाल | पुढारी

जेलमध्ये 270 हून अधिक महिला कैद्यांवर बलात्कार; राष्ट्रीय गुन्हे रेकॉर्ड ब्यूरोचा अहवाल

नवी दिल्ली; वृत्तसंस्था : देशातील जेलमध्ये 2017 ते 2022 या कालावधीत 270 हून अधिक महिला कैद्यांवर बलात्कार झाल्याची माहिती समोर आली आहे. राष्ट्रीय गुन्हे रेकॉर्ड ब्यूरोने ही आकडेवारी जारी केली आहे. बलात्काराचे सर्वाधिक प्रमाण उत्तर प्रदेश आणि मध्य प्रदेशात असल्याचे समोर आले आहे.

या घटना खूप संवेदनशील आणि घृणास्पद असून, याचे उत्तर प्रशासनाने द्या वे, असे महिलाधिकार कार्यकर्त्यांनी केले आहे. पोलिस, शासकीय नोकर, जेलचा स्टाप, रिमांड होम स्टाप आदींचा आरोपींमध्ये समावेश आहे. या सर्वांना अटक करण्यात आली आहे. जेलमध्ये असताना महिलांवर बलात्कार केल्यास घटनेतील 376 (2) कलमानुसार गुन्हा दाखल केला जातो. हा कायदा एखाद्या पोलिस अधिकार्‍याने अथवा जेलरने महिला कैद्यांवर बलात्कार केल्यासंबंधित आहे. एखाद्या अधिकार्‍याने आपल्या पदाचा गैरवापर करून महिलेवर जबरदस्तीने बलात्कार केल्यास कठोर शिक्षेची तरतूद घटनेत करण्यात आली आहे.

पीडितेला घटनेनुसार न्याय मिळण्याची तरतूद आहे. पोलिस अधिकारी आणि महिला कॉन्स्टेबलनाही पीडित महिलेबाबत अजिबात सहानुभूती नसल्याचे दिसून येत असून, याबाबत पोलिसांमध्ये संवेदनशीलता आणि जागरूकता निर्माण करण्याची गरज असल्याचे अहवालात म्हटले आहे. महिला जेलमध्ये असताना तिच्यावर अत्याचार करण्याची आपोआपच संधी मिळते. अधिकारी आपली वासना पूर्ण करण्यासाठी आपल्या ताकदीचा पूर्ण वापर करतात. घरगुती हिंसाचारामुळे एखाद्या महिलेला अटक करून जेलमध्ये टाकल्यास, तिच्यावर संरक्षण देण्याच्या आडून बलात्कार केला जातो. यासाठी कडक कायदे करणे आणि त्याची प्रभावी अंमलबजावणी करण्याची गरज असल्याचे अहवालात म्हटले आहे.

पीडितेकडे तुच्छतेने पाहिले जाते

जेलमध्ये महिला कैद्यांवर बलात्कार होण्याच्या घटना नित्याच्याच असून, पोलिस अधिकारी या पीडित महिलांकडे तुच्छ भावनेने पाहत असतात. त्यामुळे पीडित महिलांना तत्काळ न्याय मिळवून देण्याची गरज असल्याचे अहवालात म्हटले आहे.

Back to top button