

पुढारी ऑनलाईन डेस्क : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्त्वाखाली देशात पायाभूत सुविधांचा वेगाने विस्तार केला जात आहे. यातील मैलाचा दगड ठरणाऱ्या गुजरातमधील सुदर्शन सेतू या पूलाचे रविवारी लोकार्पण होणार आहे. २३२० मीटर लांबी असणारा हा पूल केबल स्टेड पद्धतीचा देशातील सर्वांत लांब पूल ठरणार आहे. श्री कृष्णाचे निवासस्थान मानले जात असलेल्या बेट द्वारकाला जवळच्या शहरापासून जोडणाऱ्या या पुलामुळे येथील पर्यटनाला चालना मिळणार आहे. (Sudarshan Setu)
पंतप्रधान मोदी रविवारी (२५ फेब्रुवारी) द्वारकाला भेट देतील. या पुलाला ओखा-बेट द्वारका सिग्नेचर ब्रिज या नावाने ही ओळखले जाणार आहे. या भागातील दळणवळण आणि पर्यटन या दोन्हींना या पुलामुळे चालना मिळणार आहे, असे गुजरातचे गृहमंत्री हर्ष संघवी यांनी म्हटले आहे.
प्रभू श्री कृष्ण जेव्हा द्वारका येथे राज्य करत होते, तेव्हा त्यांचे निवासस्थान बेट द्वारका येथे होते असे मानले जाते. बेट द्वारकाला शंखोधर असेही नाव आहे. महाभारतात अंतर्द्विप असे नाव बेट द्वारकाला होते. श्री कृष्ण आणि सुदामा यांची भेट झालेले ठिकाण म्हणजेच बेट द्वारका होय. या ठिकाणी झालेल्या उत्खननात हडाप्पाकालीन आणि मौर्य राजवटीतील अवशेष मिळाले आहेत. दरवर्षी बेट द्वारकाला २० लाख भाविक भेट देत असतात.
या पूल बांधताना स्टीलचे मनोरे आणि केबल्स यांची आकर्षक रचना करण्यात आली आहे. हा पूल ओखा आणि बेट द्वारका या बेटाला जोडणार आहे. पूर्वी या बेटावर जाण्यासाठी बोटींचा वापर करावा लागत असे. पूल झाल्यामुळे प्रवासाचा वेळ वाचणार आहे. या पुलाची रुंदी २७.२ मीटर आहे, तर दोन्ही बाजूंना फूटपाथचे नियोजन करण्यात आले आहे. दोन्ही दिशांना दोन मार्गिका आहेत. पुलाची लांबी २३२० मीटर इतकी आहे. या पुलाचा मधला टप्पा ५०० मीटर इतका लांब आहे. तसेच ५० ते ५०० मीटर लांबीचे ६ इतर टप्पे आहेत. ओखा येथून एक अॅप्रोच ब्रिज बांधला आहे, त्याती लांबी ७७० मीटर आहे. तर बेट द्वारका येथील अॅप्रोच ब्रिजची लांबी ६५० मीटर आहे.
या पुलाला २०१६ला मंजुरी मिळाली होती. त्यानंतर ७ ऑक्टोबर २०१७ला या कामाचे भूमिपूजन झाले. हा पूल बांधण्यासाठी ९६२ कोटी इतका खर्च आलेला आहे.
हेही वाचा