‘माल तोच, पॅकिंग नवीन’ : पंतप्रधान नरेंद्र मोदी | पुढारी

‘माल तोच, पॅकिंग नवीन’ : पंतप्रधान नरेंद्र मोदी

नवी दिल्ली, वृत्तसंस्था : विरोधकांची आघाडी दलित व वंचित विरोधी असून फक्त आपल्या कुटुंबाच्या स्वार्थासाठी ते एकत्र आले आहेत. ही आघाडी म्हणजे ‘माल तोच, फक्त पॅकिंग नवीन’ असा मामला आहे, अशी खरमरीत टीका पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शुक्रवारी वाराणसीत केली.

वाराणसी या आपल्या मतदारसंघाच्या दोन दिवसांच्या दौर्‍यावर आलेल्या पंतप्रधान मोदी यांनी दोन सभांना संबोधित केले तसेच संत रविदास यांच्या पुतळ्याचेही अनावरण केले. त्यांचा एक भव्य रोड शोही वाराणसीत झाला. त्याला लोकांनी प्रचंड गर्दी केली होती.

दोन्ही सभांमधील भाषणांत मोदी यांनी विरोधकांना झोडपूनच काढले. पंतप्रधान मोदी म्हणाले, विरोधकांनी मोदीला हरवण्यासाठी आघाडी बनवली आहे. स्वार्थी लोकांची ही आघाडी म्हणग्जे जुनाच माल नवीन पॅकिंगमध्ये असा मामला आहे. देशात जातींच्या नावावर लोकांना भडकावणारे आणि त्यांच्यात भांडणे लावण्यातच धन्यता मानणारे हे विरोधी आघाडीचे लोक आहेत. ते सतत दलित व वंचितांच्या हिताच्या योजनांना विरोध करीत आले आहेत. जातीच्या कल्याणाच्या नावाखाली आपल्याच परिवाराच्या स्वार्थाचे राजकारण हाच यांचा धंदा बनला आहे, अशी टीका त्यांनी केली.

राहुल गांधी यांच्यावरही बरसले

काँग्रेस नेते राहुल गांधी यांचा युवराज असा उल्लेख करीत पंतप्रधान त्यांच्यावर अक्षरशः बरसले. ते म्हणााले, मोदीला शिव्या देण्यातच त्यांनी दोन दशके वाया घालवली. आता ईश्वररूपी जनता जनार्दनावर आणि उत्तर प्रदेशच्या तरुणांवर हे लोक आपला राग काढत आहेत. काँग्रेसचे युवराज म्हणतात की काशीचे तरुण, यूपीचे तरुण नशेडी आहेत. जे स्वतःच शुद्धीत नाहीत, ते माझ्या काशीच्या मुलांना नशेडी म्हणत आहेत. त्यांच्या रागाचे आणखी एक कारण म्हणजे त्यांना काशी आणि अयोध्येचे बदललेले स्वरूप बिलकुल आवडलेले नाही. ते आपल्या भाषणात राम मंदिराबाबत काहीही बोलत असतात. काँग्रेसला प्रभू श्रीरामाबाबत इतका राग का हे कळत नाही. ते आपला परिवार आणि व्होटबँक या पलीकडे बघायलाच तयार नाहीत. पण अशा लोकांबाबत काळजी करण्याचे कारण नाही.

संत रविदास पुतळ्याचे अनावरण

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते गुरू संत रविदास यांच्या पुतळ्याचे अनावरण करण्यात आले. यावेळी बोलताना त्यांनी बनारसला मिनी पंजाब असे संबोधित केले. ते म्हणाले की, मी संत रविदास यांच्या संकल्पांनाच पुढे घेऊन जात आहे. त्यांनीच मला सेवेची संधी दिली, हे मी माझे सौभाग्य समजतो.

Back to top button