शाळेत मुले आणि मुली घालतात एकच युनिफॉर्म; जाणून घ्या कसा आहे जेंडर न्यूट्रल युनिफॉर्म? | पुढारी

शाळेत मुले आणि मुली घालतात एकच युनिफॉर्म; जाणून घ्या कसा आहे जेंडर न्यूट्रल युनिफॉर्म?

पुढारी ऑनलाईन: “काय मुलांसारखे कपडे घातले आहेत?” तुम्ही जर मुलगी असाल तर जीन्स-शर्ट परिधान केल्यांनतर हे शब्द तुम्ही कधीतरी ऐकले असतीलच. अनेकदा मुलालाही ‘काय मुलींसारखे’ कपडे घातले आहेत’ असे शब्द ऐकायला मिळतात. आता मात्र केरळमधील शाळेतील मुला-मुलींसाठी हे शब्द कोणीही वापरू शकणार नाही. या शाळेने मुला-मुलींसाठी एकसमान ड्रेस कोड म्हणजेच युनिफॉर्म लागू केला आहे. शाळेच्या या निर्णयाचे देशभरातून कौतुक होत आहे. या उपक्रमामुळे लैंगिक समानतेचा विचार शाळेत असतानाच मुलांमध्ये रुजण्यास मदत होणार आहे.

काय आहे संपूर्ण प्रकरण? शाळेने हे पाऊल का उचलले? जेंडर न्यूट्रल युनिफॉर्म म्हणजे काय? आणि जगभरातील शाळांमध्ये लैंगिक समानता वाढवण्यासाठी आणखी कोणते उपक्रम घेतले जात आहेत? चला तर मग जाणून घेऊयात.

नेमकं प्रकरण काय ?

केरळमधील एर्नाकुलम जिल्ह्यात वलयानचिरांगरा येथे एक सरकारी शाळा आहे. या शाळेने आपल्या विद्यार्थ्यांसाठी जेंडर न्यूट्रल गणवेश तयार केला आहे. जेंडर न्यूट्रल युनिफॉर्म, म्हणजेच असा गणवेश जो मुले आणि मुली दोघेही परिधान करू शकतात. शाळेने आपल्या सर्व विद्यार्थ्यांसाठी शर्ट आणि 3/4 शॉर्ट्सचा गणवेश तयार केला आहे. म्हणजेच मुलगा किंवा मुलगी दोघेही आता शर्ट आणि शॉर्ट्स घालूनच शाळेत येतील.

या युनिफॉर्ममागची गोष्ट

केरळमधील शाळेने 2018 मध्ये सुमारे 200 पूर्व-प्राथमिक विद्यार्थ्यांसाठी जेंडर न्यूट्रल ड्रेसकोड लागू केला. पुढील वर्षी शाळेतील सर्व विद्यार्थ्यांसाठी हा ड्रेस कोड लागू करण्याची योजना होती, परंतु कोरोनामुळे शाळा बंद पडल्याने हे काम होऊ शकले नाही. लॉकडाऊननंतर शाळा पुन्हा सुरू होताच सर्व विद्यार्थ्यांसाठी हा ड्रेस कोड लागू करण्यात आला. सध्या शाळेत एकूण 746 विद्यार्थी आहेत. हा निर्णय घेण्यापूर्वी विद्यार्थी आणि पालकांची संमती घेण्यात आली होती. या निर्णयामुळे विद्यार्थी आणि पालक दोघेही खूश असल्याचे शाळा व्यवस्थापनाचे म्हणणे आहे.

नुकतेच केरळमधील एका महाविद्यालयाने एका महिला प्राध्यापिकेला साडी नेसून महाविद्यालयात येण्यास सांगितले होते. प्राध्यापकाने तसे करण्यास नकार दिला. हे प्रकरण तापल्यानंतर केरळच्या उच्च शिक्षण विभागाने एक परिपत्रक काढून महिलांना कामाच्या ठिकाणी त्यांच्या आवडीचे कपडे घालण्याचे स्वातंत्र्य असल्याचे म्हटले होते.

शाळेने हा निर्णय का घेतला?

वास्तविक, स्त्री-पुरुष समानता कार्यक्रमातुन होत असलेल्या प्रयत्नांचा हा एक छोटासा भाग आहे. जेंडर इक्वालिटी म्हणजेच लैंगिक समानता. या उपक्रमांतर्गत स्त्री-पुरुषांमधील लिंगाच्या आधारे होणारा भेदभाव संपुष्टात येण्यास मदत होणार आहे. सध्या शाळांमध्ये मुले-मुली वेगवेगळे कपडे घालतात. वेगवेगळे कपडे परिधान करण्यामागे कोणतेही शास्त्रीय कारण नसून शारीरिक स्वरूप आहे.

मुलींच्या वेगवेगळ्या ड्रेस कोडमुळे त्यांना चालणे, काम करणे कठीण होते. हे लैंगिक असमानतेचेही प्रतीक आहे. यासाठी जेंडर न्यूट्रल ड्रेस कोडची मागणी बऱ्याच दिवसांपासून होत होती. याला पुढे नेत शाळेने हा निर्णय घेतला आहे. या निर्णयाचे कौतुक करताना केरळचे शिक्षण मंत्री व्ही शिवाकुट्टी म्हणाले की, लैंगिक समानतेचे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी आम्हाला आणखी अशा प्रयत्नांची गरज आहे.

लैंगिक समानता वाढवण्यासाठी शाळांमध्ये आणखी कोणते उपक्रम घेतले जात आहेत?

लैंगिक समानतेची समज शाळेतूनच मुलांमध्ये रुजवली पाहिजे, असे तज्ज्ञांचे मत आहे. त्यामुळे जगभरातील विविध शाळांमध्ये लैंगिक समानतेला प्रोत्साहन देण्यासाठी वेगवेगळे उपक्रम राबवले जात आहेत.

जेंडर न्यूट्रल टॉयलेट

जगभरातील शाळांमध्ये जेंडर न्यूट्रल टॉयलेटही सुरू करण्यात येत आहेत. जेंडर न्यूट्रल टॉयलेट्स, म्हणजेच तीनही लिंगांच्या मुलांना वापरता येणारी शौचालये. शाळांव्यतिरिक्त सार्वजनिक ठिकाणीही अशी स्वच्छतागृहे बनवली जात आहेत.

जेंडर सेंसिटिव्ह अभ्यासक्रम

अनेक देश त्यांच्या शालेय आणि महाविद्यालयीन अभ्यासक्रमात बदल करून जेंडर सेंसिटिव्ह बनवण्याचे काम करत आहेत. यामध्ये अभ्यासक्रमातील बदलांपासून ते शिक्षकांच्या प्रशिक्षणापर्यंतच्या कार्यक्रमांचा समावेश आहे. केरळच्या शिक्षणमंत्र्यांनी असेही म्हटले आहे की लिंग समानतेबद्दल जागरुकता निर्माण व्हावी यासाठी अभ्यासक्रमातही बदल केले जातील.

पीरियड्स बॉक्स

जरी हा उपक्रम भारतातील निवडक शाळांनीच राबवला असला तरी हा एक यशस्वी उपक्रम मानला जातो. त्याअंतर्गत शाळांमध्ये पिरियड बॉक्स बसवण्यात आले. पीरियड्स दरम्यान जाणारे वापरलेले सॅनिटरी पॅड आणि नॅपकिन या बॉक्समध्ये ठेवण्यात आले होते. तसेच, पीरियड्स आणि त्यासंबंधीच्या प्रश्नांवर शाळांमध्ये प्रश्नोत्तर सत्रांचे आयोजन करण्यात येते.

 

Back to top button