Gaganyaan Mission : मानवाला अंतराळात घेऊन जाणार्‍या इंजिनची चाचणी यशस्वी | पुढारी

Gaganyaan Mission : मानवाला अंतराळात घेऊन जाणार्‍या इंजिनची चाचणी यशस्वी

बंगळूर; वृत्तसंस्था : अवकाश संशोधन संस्थेने (इस्रो) मानवाला अंतराळात घेऊन जाणार्‍या क्रायोजनिक इंजिनची बुधवारी यशस्वी चाचणी घेतली. ‘सीई-20’ या क्रायोजनिक इंजिनची अंतिम चाचणी यशस्वी झाल्याची माहिती ‘इस्रो’च्या वतीने देण्यात आली. मानवाला अंतराळात घेऊन जाणार्‍या क्रायोजनिक इंजिनच्या चार चाचण्या घेण्यात आल्या. मानवाला घेऊन उड्डाण करणार्‍या यानासाठी लागणार्‍या चार इंजिनच्या अचूक चाचण्या पार पाडण्यात आल्या. अखेरची चाचणीही नुकतीच घेण्यात आल्याची माहिती ‘इस्रो’मधील सूत्रांनी दिली.

मानवासह गगनयानाच्या प्रक्षेपणासाठी इंजिन प्रज्वलित होण्यासाठी 6,350 सेकंदांचा प्रमाणित कालावधी लागतो. ‘इस्रो’च्या चाचणीमध्ये यासाठी 8,810 सेकंदांचा कालावधी लागला. यासाठी 39 हॉट फायरिंग टेस्ट घेऊन अचूक वेळेची चिकित्सा करण्यात आली. ‘एलव्हीएम 3’ या लाँच व्हेईकलमधून मानव अंतराळात झेपावणार आहे. त्यामुळे या गुंतागुतींच्या मोहिमेसाठी विविध चाचण्या घेण्यात आल्या आहेत. यामधून इंजिनची सुरक्षा आणि विश्वासार्हता तपासण्यात आली.

‘गगनयान-1’चे प्रक्षेपण 2024 मधील दुसर्‍या तिमाहीत पार पडणार आहे. या टप्प्यात मानवरहित यान अवकाशात झेपावणार आहे. त्यानंतर टप्प्याटप्प्याने गगनयानाच्या मोहिमा पार पाडण्यात येणार आहेत. रोबोटिक्स मोहिमेनंतर अखेरच्या गगनयान मोहिमेत मानवाला अवकाशात पाठविले जाईल, अशी माहिती ‘इस्रो’तील सूत्रांनी दिली.

Back to top button