Lok Sabha Election 2024 | ‘या’ ३ योजना ठरल्या गेमचेंजर, ज्यांनी ‘मोदीं’चे भविष्य केले ‘उज्ज्वल’

Lok Sabha Election 2024 | ‘या’ ३ योजना ठरल्या गेमचेंजर, ज्यांनी ‘मोदीं’चे भविष्य केले ‘उज्ज्वल’

पुढारी ऑनलाईन डेस्क : मध्य प्रदेशमध्ये भाजपची 'लाडली बहना' ही योजना यशस्वी ठरली आणि या योजनेच्या रूपाने त्यांनी राज्यात पुन्हा एकदा सत्ता मिळवली. महिलांमध्ये लोकप्रिय ठरतील अशा योजना राबवून महिला वर्गाची मते खेचून घेण्याचा भाजपचा प्रयत्न याआधीच्या निवडणुकांमध्ये यशस्वी झालाय. गेल्या दशकभरात भाजपला राज्य आणि केंद्रात सत्ता मिळवण्यासाठी महिला मतदारांची भूमिका महत्त्वाची राहिली आहे. मागच्या निवडणुकांवर नजर टाकल्यास महिला केंद्रीत योजनांचा भाजपला लाभ झाल्याचे दिसून येते. (Lok Sabha Election 2024)

निवडणूक विश्लेषक प्रदीप गुप्ता यांनी त्यांच्या 'हाउ इंडिया व्होट्स अँड व्हॉट इट मीन्स' या त्यांच्या पुस्तकात मोदी सरकारच्या कोणत्या योजना गेमचेंजर राहिल्या आहेत; याचा संदर्भ दिला आहे. मोदी सरकारने २०१४ मध्ये जी आश्वासने दिली होती ती त्यांनी पुढच्या पाच वर्षात पूर्ण केली. याचा फायदा भाजपला २०१९ मधील निवडणुकीत झाला. ३ यशस्वी योजना भाजपसाठी २०१९ मध्ये गेमचेंजर ठरल्या त्या म्हणजे मोफत गॅस कनेक्शन (उज्ज्वला योजना), टॉयलेट्स (स्वच्छ भारत) आणि सर्वांसाठी घरे ( पीएम आवास योजना).

महिला मतदारांपर्यंत पोहोचण्यासाठी भाजपची ही व्यूहरचना होती. ती २०१९ मध्ये यशस्वी ठरली. ज्या महिलांना केंद्र आणि राज्य सरकारच्या योजनांचा लाभ मिळाला; त्यांनी भाजपला साथ दिली. महिलांना स्वयंपाक घरात धुरापासून मुक्ती देणे, खाजगी शौचालयाची उपलब्धता अशा गृहिणींना समर्पित योजनांवर मोदी सरकारने अधिक भर दिला.

मोदींनी केवळ इंदिरा आवास योजनेचे नाव बदलणे आणि ते योग्य मार्गाने त्यांच्या टार्गेट लोकांपर्यंत पोहोचवणे, हे एवढेच त्यांना करायचे होते आणि हाच त्यांचा लोकांची मने जिंकण्याचा परफेक्ट फॉर्म्युला होता. २०१४ पासून सत्तेत आल्यापासून हीच त्यांची मध्यवर्ती थीम राहिली आहे. २०१९ च्या सार्वत्रिक निवडणुकांपूर्वी केलेल्या सर्वेक्षणातून स्पष्टपणे सूचित झाले होते की भाजपला मिळालेला मोठा जनादेश मुख्यत्वे यावर आधारित होता.

'भाजप'पासून दूर राहिलेल्या समाजापर्यंत पीएम मोदी पोहोचले

पंतप्रधान मोदींनी तिहेरी तलाकवर बंदी आणण्याचे आश्वासन दिले होते. त्यांनी त्यांचा शब्द पाळत मुस्लीम महिलांना या कुप्रथेतून मुक्त केले. सर्वोच्च न्यायालयाने तिहेरी तलाक घटनाबाह्य ठरवत सरकारला कायदा करण्याचा निर्देश दिले होते. न्यायालयाच्या निर्देशानंतर केंद्र सरकारने १ ऑगस्ट २०१९ रोजी देशात तिहेरी तलाक प्रतिबंधक कायदा लागू केला. या कायद्यामुळे तिहेरी तलाक ही सामाजिक कुप्रथा असून तो फौजदारी गुन्हा समजला जातो. देशभरातील मुस्लीम महिलांनी या कायद्याचे स्वागत केले. यामुळे भाजपपासून दूर राहिलेल्या समाजापर्यंत पीएम मोदी पोहोचले.

महिला मतदारांच्या संख्येत वाढ

नागरीकरणाच्या सुरुवातीपासून महिला गरजा आणि इच्छा यांच्यात विवेकपूर्ण निवड करून घर चालवत आल्या आहेत. एकविसाव्या शतकातील भारतात, आर्थिक स्वावलंबन आणि महिला स्वातंत्र्य यामुळे मनुष्यबळांमध्ये त्यांचा वाढता सहभाग आणि स्वतंत्र निर्णयक्षमतेमुळे महिला म्हणून मतदानाचा हक्क बजावणाऱ्यांमध्ये लक्षणीय वाढ झाली आहे. २००४ मध्ये ५३.६ टक्के महिलांचे मतदान झाले. २०१९ मध्ये ६७.२ टक्के महिलांनी मतदानाचा हक्क बजावला. हीच संधी राजकीय पक्षांनी हेरली आणि राजकीय पक्षांची महिला केंद्रीत योजनांवर अधिक भर दिला.

'सुशासन बाबू'नाही महिलांचा पाठिंबा

अनेक राज्ये आणि केंद्रीय निवडणुकीत गेल्या दशकभरात अनेक नेत्यांनी महिला मतदारांच्या पाठिंब्यावर यश मिळवले असल्याचे दिसून आले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी असोत अथवा तामिळनाडूचे माजी मुख्यमंत्री एम.जी. रामचंद्रन, जे. जयललिता, दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल, ओडिशाचे मुख्यमंत्री नवीन पटनाईक यांचे नेहमीच महिलांच्या कल्याणाकडे अधिक लक्ष राहिले आहे. बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांची 'सुशासन बाबू' अशी प्रतिमा राहिली आहे. त्यांनी मागच्या कार्यकाळात केलेली दारुबंदी आणि विद्यार्थिनींना सायकल वाटप अशा त्यांच्या निर्णयामुळे त्यांना महिला मतदारांचा पाठिंबा राहिला आहे.

दिल्लीत केजरीवालांची 'आपका बडा भाई' प्रतिमा

दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी २०२० मध्ये तिसऱ्यांदा निवडणूक जिंकली. त्यांचा मोफत योजनांवर भर राहिला. त्यांनी महिलांसाठी दिल्लीत मोफत बस आणि मेट्रो प्रवास योजना जाहीर केली. तसेच त्यांनी महिलांच्या सुरक्षेसाठी पथदिव्यांची व्यवस्था, सीसीटीव्ही कॅमेरे आणि सार्वजनिक ठिकाणी मार्शल्स तैनात करण्याची योजना आणली. त्यांनी सरकारी शाळांचा चेहरामोहरा बदलला. सरकारी शाळांमधील पालक-शिक्षक बैठकांत बदल घडवून आणला. समर कॅम्प्स, इंग्लिश स्पिकिंग क्लासेस आदी उपक्रम त्यांनी राबविले. यामुळे केजरीवाल 'आपका बडा भाई' अथवा ' घर का बडा बेटा' अशी स्वतःचा उल्लेख करत मतदारांना समोरे गेले. या जोरावर केजरीवालांच्या नेतृत्त्वाखालील 'आप'ने दिल्ली विधानसभा निवडणुकीत दणदणीत विजय मिळवत सत्तेत वापसी केली. त्यांच्या विजयामागे महिला मतदारांचा मोठा हातभार होता. (Lok Sabha Election 2024)

(या लेखासाठी How India Votes And What It Means या पुस्तकाचा संदर्भासाठी वापर करण्यात आला आहे.)

हे ही वाचा :

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news