पुढचे शंभर दिवस जोमाने काम करा; सर्व लाभार्थींपर्यंत पोहोचा : पंतप्रधान मोदी

पुढचे शंभर दिवस जोमाने काम करा; सर्व लाभार्थींपर्यंत पोहोचा : पंतप्रधान मोदी

नवी दिल्ली; पुढारी वृत्तसेवा : आगामी लोकसभा निवडणुकांच्या द़ृष्टिकोनातून पुढील शंभर दिवसांत जोमाने कामाला लागा आणि नव्या विश्वासासह प्रत्येक लाभार्थ्यापर्यंत पोहोचा, असे आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारी भाजपचे सर्व कार्यकर्ते, पदाधिकार्‍यांना केले.
राष्ट्रीय लोकशाही आघाडीला चारशे जागांचा आकडा पार करण्यासाठी भाजपला 370 जागा मिळणे अत्यावश्यक आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले. भाजपच्या दोन दिवसांच्या अधिवेशनात कार्यकर्त्यांना संबोधित करताना त्यांनी विजयाचा मंत्रही दिला.

मोदी म्हणाले, येत्या शंभर दिवसांत सर्व लाभार्थ्यांपर्यंत पोहोचण्यासाठी भाजपच्या सर्व कार्यकर्त्यांनी प्रयत्नांची शर्थ केली पाहिजे. केंद्र सरकारने बजावलेली कामगिरी आणि विविध पातळ्यांवर मिळवलेले यश याची साद्यंत माहिती लाभार्थ्यांपर्यंत पोहोचविणे हे आव्हान आहे, असे मानून सर्वांनी प्रयत्न केले पाहिजेत. येत्या पाच वर्षांत भारताला विकसित देश बनविण्याचा संकल्प आपण केला आहे. शासकीय योजनांची जनतेला माहिती द्या, प्रत्येक लाभार्थ्याला तुम्ही माझा नमस्कार सांगा. येत्या पाच वर्षांत आपण कोणते संकल्प केले आहेत याचीही माहिती त्यांना द्या. केंद्र सरकारने आतापर्यंत केलेल्या कामगिरीची माहिती मिळाली नाही, असा एकही लाभार्थी राहता कामा नये याची पुरेपूर काळजी घ्या. बूथ पातळीवरील कार्यकर्त्यांची जबाबदारी यात अनन्यसाधारण असणार आहे, असे त्यांनी नमूद केले.

अस्थिरता, भ्रष्टाचार म्हणजेच काँग्रेस

याप्रसंगी मोदी यांनी काँग्रेसवर कडाडून हल्लाबोल केला. ते म्हणाले, अस्थिरता, परिवारवाद, भ्रष्टाचार आणि तुष्टीकरण म्हणजेच काँग्रेस. या पक्षाने स्वतःला वाचविण्यासाठी नेहमीच अस्थिरतेचा अवलंब केला. आजदेखील त्यांच्याकडे विकासाचा कसलाही अजेंडा नाही. देशाच्या राष्ट्रीय सुरक्षेशी तडजोड करण्याची एकही संधी काँग्रेसने सोडली नाही. गांधी-नेहरू कुटुंब म्हणजेच काँग्रेस हे समीकरण त्यांच्या कार्यकाळात पक्के झाले. आम्ही ती व्यवस्था बदलली. त्यामुळेच काँग्रेसचा
जळफळाट झाला आहे, असा घणाघात त्यांनी केला.

आम्ही शिवरायांना मानणारे लोक

आपल्या भाषणात मोदी यांनी छत्रपती शिवाजी महाराजांचा आदरपूर्वक उल्लेख केला. ते म्हणाले, आम्ही शिवाजी महाराजांना मानणारे लोक आहोत. जेव्हा छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक झाला, तेव्हा त्यांनी असा विचार नाही केला की, आता छत्रपती बनलो आहोत. सत्ता मिळाली, तर त्याचा आनंद घेऊया. आराम करूया. त्यांनी रयतेच्या सर्वांगीण कल्याणाचा ध्यास घेतला होता. त्यांच्याकडून प्रेरणा घेऊन आपल्याला पुढे जायचे आहे. मी स्वतःच्या सुखासाठी जगणारा माणूस नाही. जर मी माझ्या घराची काळजी केली असती, तर आज कोट्यवधी गरिबांची घरे बनवू शकलो नसतो. मी देशातील कोट्यवधी मुलांच्या भविष्यासाठी जगतोय. जागतो, झगडत राहतो, असे मोदी म्हणाले.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news