Delhi | दिल्लीत लग्नाचा मंडप कोसळला, अनेकजण जखमी, २५-३० मजुरांची सुटका | पुढारी

Delhi | दिल्लीत लग्नाचा मंडप कोसळला, अनेकजण जखमी, २५-३० मजुरांची सुटका

पुढारी ऑनलाईन : दिल्लीतील जवाहरलाल नेहरू स्टेडियमच्या गेट क्रमांक २ जवळ उभारण्यात आलेला लग्नाचा मंडप शनिवारी सकाळी कोसळण्याची घटना घडली. या दुर्घटनेत अनेकजण जखमी झाले आहेत. या मंडपाखाली अडकलेल्या २५-३० जणांची सुटका करून त्यांना एम्स ट्रॉमा सेंटर आणि सफदरजंग रुग्णालयात उपचारासाठी नेण्यात आले आहे.

पोलीस आणि अग्निशमन दल घटनास्थळी बचावकार्य करत आहे. हा मंडप लग्न समारंभासाठी उभारला होता. एका सुरक्षा रक्षकाने सांगितले की, कामगार जेवणासाठी थांबले असताना मंडप कोसळला. यामुळे मोठी दुर्घटना टळली.

दिल्ली पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, “आज सकाळी ११.१५ च्या सुमारास जवाहरलाल नेहरू स्टेडियमच्या गेट २ वर एका लग्न समारंभासाठी उभारलेला एक मंडप कोसळला. त्याखाली सुमारे २५-३० मजूर अडकले होते. त्यांना बाहेर काढून एम्स ट्रॉमा रुग्णालयात उपचारासाठी नेण्यात आले आहे. अद्याप कोणतीही जीवितहानी झालेली नाही. पोलीस, अग्निशमन दल बचावकार्य करत असून रुग्णवाहिका घटनास्थळी आहे.”

लाल बहादूर शास्त्री हॉस्पिटलच्या आपत्कालीन सेवा विभागाचे वैद्यकीय तंत्रज्ञ आसिफ अन्सारी यांनी सांगितले, “जखमी झालेल्या १०-१२ लोकांना येथील रुग्णालयात आणण्यात आले आहे. बचावकार्य सुरू आहे.”

या घटनेबाबत बोलताना डीसीपी दक्षिण अंकित चौहान म्हणाले, “सकाळी ११.१५ च्या सुमारास, एक मंडप कोसळल्याचा फोन आला आणि त्याखाली काही मजूर अडकल्याची शक्यता आहे. घटनास्थळी पोहोचल्यानंतर मंडपाखाली २५-३० मजूर अडकल्याचे आढळून आले. लग्न समारंभासाठी हा मंडप उभारण्यात आला होता. २५-३० जणांची सुटका करून त्यांना एम्स ट्रॉमा सेंटर आणि सफदरजंग रुग्णालयात नेण्यात आले. बचावकार्यासाठी एनडीआरएफची टीम सध्या घटनास्थळी आहे.”

Back to top button