Priyanka Gandhi News: भारत जोडो न्याय यात्रेत आज प्रियंका गांधी सहभागी होणार नाहीत, तब्येतीच्या कारणास्तव निर्णय | पुढारी

Priyanka Gandhi News: भारत जोडो न्याय यात्रेत आज प्रियंका गांधी सहभागी होणार नाहीत, तब्येतीच्या कारणास्तव निर्णय

नवी दिल्ली, पुढारी वृत्तसेवा: काँग्रेस नेत्या प्रियंका गांधी उत्तर प्रदेशात आज भारत जोडो न्याय यात्रेत सहभागी होणार नाहीत. त्यांनी स्वतः याबाबत कळवले आहे. राहुल गांधींची भारत जोडो न्याय यात्रा आज उत्तर प्रदेशच्या चंदौलीमध्ये प्रवेश करणार आहे. या पार्श्वभूमीवर यात्रेचे स्वागत करण्यासाठी प्रियंका गांधी उपस्थित राहणार होत्या. मात्र तब्येतीच्या कारणास्तव त्या हजर राहू शकणार नाहीत, अशी माहिती त्यांनी स्वत: एक्स पोस्ट करत दिली आहे. (Priyanka Gandhi News)
काँग्रेस नेते राहुल गांधींची भारत जोडो न्याय यात्रा बिहारमधून शुक्रवारी उत्तर प्रदेशातील चंदौलीमध्ये दाखल होणार आहे. यावेळी काँग्रेस सरचिटणीस प्रियंका गांधी राहुल गांधींचे आणि यात्रेचे स्वागत करणार होत्या. मात्र, प्रकृतीच्या कारणास्तव त्या उपस्थित राहू शकणार नाहीत. याबाबतची माहिती त्यांनी सोशल मीडियावर दिली आहे. प्रियंका गांधी यांनी सोशल मीडियाद्वारे सांगितले की, “मी खूप उत्साहाने आणि आतुरतेने भारत जोडो न्याय यात्रा उत्तर प्रदेशात पोहोचण्याची वाट बघत होते. मात्र आजारपणामुळे मला आजच रुग्णालयात दाखल व्हावे लागले. प्रकृती बरी झाल्यानंतर मी यात्रेत सामील होईन.” असे त्या म्हणाल्या. तसेच चंदौली-बनारसला यात्रेत पोहोचणाऱ्या सर्व सहकाऱ्यांना आणि उत्तर प्रदेशात यात्रेसाठी तयारी करणाऱ्या कार्यकर्त्यांना शुभेच्छाही त्यांनी दिल्या आहेत. (Priyanka Gandhi News)
दरम्यान, गेले काही दिवस प्रियंका गांधी यात्रेत का सहभागी होत नाही, यावरून अनेक चर्चा होत्या. या पार्श्वभूमीवर अखेर प्रियंका गांधी आज यात्रेत सहभागी होणार असल्याची माहिती काँग्रेसकडून देण्यात आली होती. (Priyanka Gandhi News)

Priyanka Gandhi News: त्या यात्रेत सहभागी का नाहीत? चर्चेला उधाण

काही दिवसांपुर्वीच काँग्रेसमध्ये संघटनात्मक फेरबदल करण्यात आले होते. त्यात प्रियंका गांधी यांना सरचिटणीस पद देण्यात आले मात्र कुठल्याही राज्याची किंवा विभागाची जबाबदारी देण्यात आली नव्हती. पक्षात त्या एकमेव सरचिटणीस आहेत ज्यांना कुठल्याही विभागाची जबाबदारी देण्यात आली नाही. हे असताना उत्तर प्रदेशच्या प्रभारी असतानाही त्यांच्याकडे राज्याचा कारभार नव्हता, असा दावा नुकतेच काँग्रेस मधून निलंबित करण्यात आलेले आचार्य प्रमोद कृष्णम यांनी केला होता. त्यामुळे खरच प्रियंका गांधी नाराज आहेत का, आणि म्हणून गेल्या दीड महिन्यापासून त्या यात्रेत सहभागी झाल्या नाहीत का, अशा अनेक चर्चांना उधाण आले होते. या सर्व चर्चांना अखेर काल पूर्णविराम मिळाला. मात्र पुन्हा प्रकृतीच्या कारणास्तव प्रियंका गांधी यात्रेत सहभागी होऊ शकणार नाहीत, असे त्यांनी स्वत: X पोस्ट करत माहिती दिली आहे.
 
हेही वाचा:

Back to top button