India UPI Services : भारताची युपीआय सेवा श्रीलंका, मॉरिशसमध्ये सुरू | पुढारी

India UPI Services : भारताची युपीआय सेवा श्रीलंका, मॉरिशसमध्ये सुरू

नवी दिल्ली, पुढारी वृत्तसेवा : India UPI Services : भारतीय युपीआय (युनिफाइड पेमेंट्स इंटरफेस) सेवेची सुरुवात सोमवारी श्रीलंका आणि मॉरिशसमध्ये दिल्लीतुन करण्यात आली. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या उपस्थितीत आभासी पद्धतीने पार पडलेल्या या कार्यक्रमाला मॉरिशसचे पंतप्रधान प्रविंद जगन्नाथ आणि श्रीलंकेचे राष्ट्रपती रानिल विक्रमसिंघे उपस्थित होते.

श्रीलंका आणि मॉरिशसमध्ये भारतीय युपीआय सेवेमुळे दोन्ही देशांसोबतच्या आर्थिक संबंधांमध्ये वाढ होणार आहे. या सेवेमुळे श्रीलंका आणि मॉरिशसमध्ये प्रवास करणाऱ्या भारतीय नागरिकांना या सेवेचा मोठा फायदा होणार आहे.

भारतीय युपीआय सेवा श्रीलंका आणि मॉरिशसमध्ये सुरु झाल्यामुळे भारत, श्रीलंका आणि मॉरिशस या देशातील पर्यटन वाढेल. भारतीय पर्यटक देखील युपीआय सेवा उपलब्ध असलेल्या ठिकाणांना प्राधान्याने भेटी देतील, असा विश्वास पंतप्रधान नरेंद्र मोदींनी यावेळी व्यक्त केला. तसेच श्रीलंका आणि मॉरिशस या दोन देशांनाही याचा फायदा होणार असल्याचे पंतप्रधान मोदी म्हणाले. (India UPI Services)

मागील वर्षी श्रीलंकेचे राष्ट्रपती रानिल विक्रमसिंघे यांच्या भारत भेटीदरम्यान, दोन्ही देशांनी एक व्हिजन डॉक्युमेंट स्वीकारले होते. आर्थिक संबंध वाढवणे हा त्यातील महत्त्वाचा भाग होता. तसेच मॉरिशसचे पंतप्रधान प्रविंद जगन्नाथ यांच्याशीही याबाबत भारताची सविस्तर चर्चा झाली होती.

दरम्यान, या महिन्याच्या सुरुवातीला, फ्रान्सने पॅरिसमधील आयफेल टॉवरला भेट देणाऱ्या भारतीय पर्यटकांना युपीआय यंत्रणेद्वारे तिकिटे खरेदी करण्याची परवानगी दिली. भारतीय युपीआयद्वारे पैसे स्वीकारणारा फ्रान्स हा पहिला युरोपीय देश आहे. ही युपीआय सेवा युरोपियन देशातील इतर पर्यटन स्थळांच्या ठिकाणी आणि काही प्रमाणात व्यापाऱ्यांसाठी विस्तारित केली जाणार आहे.

गेल्या वर्षी, रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया आणि सेंट्रल बँक ऑफ यूएई यांच्यात आवश्यक सामंजस्य कराराची देवाणघेवाण करण्यात आली. भारताच्या युपीआय आणि यूएईच्या आयपीपी (इन्स्टंट पेमेंट्स प्लॅटफॉर्म) यांच्यातील एकीकरणाला चालना देण्याचा या सामंजस्य कराराचा उद्देश होता. (India UPI Services)

Back to top button