शेतकऱ्यांच्या मोर्चापूर्वी दिल्लीत कलम १४४ लागू

File Photo
File Photo

पुढारी ऑनलाईन डेस्क : आपल्या मागण्यांसाठी पुन्हा एकदा आंदोलनाच्या पवित्र्यात असलेल्या शेतकऱ्यांना रोखण्यासाठी हरियाणा सरकारने रस्त्यांवर खिळे ठोकले असताना आता दिल्लीतही कलम १४४ लागू करण्यात आले आहे. दिल्लीचे पोलिस आयुक्त संजय अरोरा यांनी ही माहिती दिली.

शेतकऱ्यांच्या 'चलो दिल्ली'च्या आवाहनाच्या पार्श्वभूमीवर हरियाणात जागोजागी सिमेंटचे ब्लॉक्स उभारून अडथळे निर्माण करण्यात आले आहेत. याशिवाय हरियाणात इंटरनेट सेवा बंद करण्यात आली असून एसएमएस सेवेवरही निर्बंध आणण्यात आले आहेत. असे असले तरी आंदोलक शेतकऱ्यांनी मंगळवारी १३ तारखेला दिल्लीत धडकण्याचा निर्धार व्यक्त केला आहे. पाठोपाठ संयुक्त किसान मोचनि १६ फेब्रुवारी रोजी भारत बंदची हाक दिली आहे.

पिकांना किमान आधारभूत किंमत देण्याची गॅरंटी आणि कर्जमाफीसह शेतकऱ्यांशी संबंधित इतर मागण्यांसाठी पंजाब, हरियाणा व उत्तर प्रदेशचे शेतकरी पुन्हा रस्त्यावर आले आहेत. या शेतकऱ्यांनी १३ फेब्रुवारी रोजी दिल्लीत धडकण्याचा इशारा दिला आहे. गेल्या दोन दिवसांपासूनच दिल्लीच्या सीमेवर शेतकरी दाखल झाले असून रस्त्यांवर वाहतूक कोंडी झाली आहे. शेतकऱ्यांच्या या आंदोलनामुळे २०२० च्या शेतकरी आंदोलनाची आठवण झाली असून तितका हा तिढा वाढू नये यासाठी सरकारी पातळीवर चर्चा आणि दुसरीकडे शेतकऱ्यांना रोखण्यासाठी उपायही आखले जात आहेत. शेतकऱ्यांना दिल्लीला जाण्यापासून रोखण्यासाठी हरियाणाच्या मनोहरलाल खट्टर सरकारने कठोर उपायांचा वापर केला आहे. वाहने जाऊ नयेत म्हणून रस्त्यांवर खिळे ठोकण्यात आले आहेत. जागोजाग सिमेंटचे ब्लॉक्स अडथळे म्हणून उभारण्यात आले आहेत. त्याशिवाय सीमावर्ती भागातील इंटरनेट सेवा बंद करण्यात आली असून बल्क एसएमएस सेवाही स्थगित करण्यात आली आहे. याशिवाय पोलिस कुमक वाढवण्यात आली असून त्यांच्याकडील वॉटर कॅननही सज्ज ठेवण्यात आल्या आहेत.

दिल्लीत कलम १४४ लागू, अश्रुधुराचा सराव

एकीकडे हरियाणा सरकारने शेतकऱ्यांना रोखण्यासाठी कंबर कसली असतानाच दिल्ली पोलिसांनीही कोणतीही कसर बाकी ठेवलेली नाही. त्यांनीही मोठमोठे कंटेनर व क्रेन्स रस्त्यांवर आडवे लावत बाहेरून येणाऱ्या शेतकऱ्यांची नाकेबंदी करण्याचा प्रयत्न केला आहे. संपूर्ण दिल्लीत कलम १४४ लागू करण्यात आले आहे. जर २०२१ सारखी परिस्थिती आली तर शेतकऱ्यांना रोखण्यासाठी अश्रुधुराचा वापर करण्याचा सरावही करण्यात आला. पंजाब, दिल्ली व हरियाणा या तिन्ही राज्यांच्या पोलिसांनी शेतकऱ्यांना रोखण्यासाठी ट्रॅक्टरचा वापर करीत सराव केल्याचे सांगण्यात आले.

हेही वाचा : 

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news