कतारमध्ये फाशीची शिक्षा सुनावलेल्या ८ भारतीय नौदल अधिकाऱ्यांची सुटका | पुढारी

कतारमध्ये फाशीची शिक्षा सुनावलेल्या ८ भारतीय नौदल अधिकाऱ्यांची सुटका

पुढारी ऑनलाईन डेस्क : भारताने पुन्हा एकदा मोठा राजनैतिक विजय मिळवला आहे. कतारमध्ये हेरगिरीच्या कथित प्रकरणात मृत्युदंडाची शिक्षा झालेल्या ८ माजी भारतीय नौदलाच्या अधिकाऱ्यांची सुटका केली आहे. आठही भारतीयांच्या सुटकेबद्दल भारत सरकारने आनंद व्यक्त केला आहे. परराष्ट्र मंत्रालयाने सांगितले की, आठ पैकी सात भारतीय भारतात परतले आहेत. आमच्या नागरिकांच्या सुटकेची आणि घरी परतण्याची परवानगी देण्याच्या कतारच्या अमीराच्या निर्णयाचे आम्ही कौतुक करतो. (India-Qatar)

दोहास्थित अल दाहरा ग्लोबल टेक्नॉलॉजीजमध्ये हे ८ आठ माजी नौसैनिक काम करत होते. त्यांना ऑगस्ट २०२२ मध्ये हेरगिरीच्या आरोपाखाली अटक करण्यात आली होती. मात्र, हे आरोप कधीच सार्वजनिक झाले नाहीत. या सर्वांवर पाणबुडी प्रकल्पाची हेरगिरी केल्याचा आरोप असल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे. अल दहरा ग्लोबल कंपनी कतारच्या लष्करी दलांना आणि इतर सुरक्षा संस्थांना प्रशिक्षण आणि इतर सेवा पुरवते. एका वर्षाहून अधिक काळ तुरुंगात घालवल्यानंतर या माजी नौसैनिकांना ऑक्टोबरमध्ये कतारमधील कनिष्ठ न्यायालयाने फाशीची शिक्षा सुनावली होती. या संदर्भात कतारने यापूर्वी कोणतीही माहिती न दिल्याने केंद्र सरकार आश्चर्यचकित झाले आहे. भारताने या निर्णयाविरोधात अपील केले होते. कतार हा भारताला नैसर्गिक वायूचा मोठा पुरवठा करणारा देश आहे. सुमारे आठ लाख भारतीय तेथे काम करतात. दोन्ही देशांमध्ये नेहमीच चांगले संबंध राहिले आहेत. (India-Qatar)

नुकतेच कतारने आठ अधिकाऱ्यांची फाशीची शिक्षा रद्द केल्याने भारताला राजनैतिक यश मिळाले. परराष्ट्र मंत्रालयाने ही माहिती दिली आहे. दुबईत COP-28 परिषदेच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि कतारचे अमीर शेख तमीम बिन हमाद अल थानी यांच्यात झालेल्या बैठकीच्या चार आठवड्यांच्या आत ही घोषणा करण्यात आली होती. 1 डिसेंबर रोजी झालेल्या बैठकीनंतर पंतप्रधान मोदी म्हणाले होते की, मी कतारमध्ये राहणाऱ्या भारतीय समुदायाबद्दल अमीरांशी बोललो आहे. या काळात नौदल कर्मचाऱ्यांचा प्रश्नही उपस्थित झाला असेल, असे मानले जात आहे. (India-Qatar)

हेही वाचा : 

Back to top button