शेवटच्या अधिवेशनात दिसली महाराष्ट्रातील फाटाफूट

शेवटच्या अधिवेशनात दिसली महाराष्ट्रातील फाटाफूट
Published on
Updated on

नवी दिल्ली; पुढारी वृत्तसेवा : 17 व्या लोकसभेच्या शेवटच्या अधिवेशनाचा आज अखेरचा दिवस होता. यामध्ये महाराष्ट्रासह देशभरातील निवडक खासदारांनी भाषण केले. लोकसभेचा निरोप घेताना खासदार भावुक झाल्याचे पाहायला मिळाले. दरम्यान, गेल्या काही दिवसांत महाराष्ट्राच्या राजकारणात घडलेल्या घडामोडी आणि फाटाफुटींचे प्रतिबिंब 17 व्या लोकसभेच्या शेवटच्या अधिवेशन समारोपात दिसले. यावेळी बोलताना सध्या अर्धा पक्ष इकडे, अर्धा तिकडे असल्यामुळे पक्षाचे आभार व्यक्त करू शकत नाही, असे सुप्रिया सुळे म्हणाल्या. तर 2019 च्या लोकसभा निवडणुकांनंतर दुर्दैवाने पक्षनेतृत्वाच्या निर्णयामुळे आम्ही मविआचा भाग झालो होतो. मात्र महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली पुन्हा एनडीएचा भाग झालो, असे वक्तव्य शिवसेना शिंदे गटाचे खासदार राहुल शेवाळे यांनी केले.

दोन्ही संसदेत काम करता आले याचा आनंद

सध्या अर्धा पक्ष इकडे, अर्धा तिकडे असल्यामुळे पक्षाचे आभार व्यक्त करू शकत नाही. मात्र बारामती लोकसभा मतदारसंघाचे विशेष आभार व्यक्त करते, अशा भावना राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी व्यक्त केल्या. याप्रसंगी बोलताना सुप्रिया सुळे म्हणाल्या की, सभागृहात कधी काही मुद्द्यांवरून खडाजंगी झाली. मात्र पाच वर्षे कशी गेली कळालेच नाही. कोरोना काळामुळे 2 वर्षे अनेक कामात व्यत्यय आला तरी पाच वर्षांत नव्या गोष्टी शिकता आल्या. या पाच वर्षांमधील सहकार्यासाठी त्यांनी लोकसभा अध्यक्ष, लोकसभा अध्यक्ष कार्यालय, सत्ताधारी पक्ष, विरोधी पक्ष संसदीय कार्यमंत्री यांचे आभार व्यक्त केले. 17 व्या लोकसभेतील खासदारांना जुन्या आणि नव्या अशा दोन्ही इमारतीमध्ये काम करता आले, याचा उल्लेख केला. 17 व्या लोकसभेतील सदस्यांना दोन्ही संसदेत काम करता आले. जुन्या संसदेतील आठवणी कायम राहतील, याचाही आवर्जून उल्लेख त्यांनी केला.

वरिष्ठांनी केलेल्या मार्गदर्शनाचा फायदा

अपक्ष खासदार नवनीत राणा यांनी सभागृहातील सर्व घटकांचे आभार व्यक्त केले. पहिल्यांदा या सभागृहात आलेल्या खासदारांना अनेक नव्या गोष्टी शिकता आल्या, समजून घेता आल्या. सभागृहातील वरिष्ठ सदस्यांनी मार्गदर्शन केले त्याचा फायदा झाल्याचेही त्या म्हणाल्या. अमरावती लोकसभा क्षेत्रातील जनतेचे त्यांनी आभार मानले.

आम्ही एनडीएसोबतच निवडणूक लढणार

शिवसेना शिंदे गटाचे खासदार राहुल शेवाळे म्हणाले की, आम्ही एनडीएसोबत 2019 ची लोकसभा निवडणूक लढवली. 2024 ची लोकसभाही आम्ही एनडीएसोबत लढणार आहोत. मात्र 2019 च्या लोकसभा निवडणुका झाल्यानंतरच्या काळात दुर्दैवाने पक्षनेतृत्वाच्या निर्णयामुळे आम्ही मविआचा भाग झालो होतो. तो निर्णय आम्हाला पटला नव्हता. त्यामुळे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली पुन्हा एनडीएचा भाग झालो. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे बाळासाहेब ठाकरे यांचे विचार घेऊन पुढे जात आहेत. काश्मीरमधील कलम 370 हटवणे, भव्य राम मंदिर निर्माण अशा बाळासाहेब ठाकरे यांचे स्वप्न असलेल्या गोष्टी पंतप्रधान मोदींनी पूर्ण केल्या. यावेळी त्यांनी लोकसभा अध्यक्षांचे आभार व्यक्त केले. नव्या संसदेत कागदविरहित कामकाजासाठी आणि मार्गदर्शनासाठी त्यांनी अध्यक्षांचे आभार व्यक्त केले तसेच त्यांच्या दक्षिण मध्य मुंबई लोकसभा मतदारसंघातील जनतेचेही आभार व्यक्त केले.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news