"तुम्‍ही अशा प्रकारची भाषा वापरु नका" : राज्‍यसभा सभापतींनी खर्गेंना सुनावले | पुढारी

"तुम्‍ही अशा प्रकारची भाषा वापरु नका" : राज्‍यसभा सभापतींनी खर्गेंना सुनावले

पुढारी ऑनलाईन डेस्‍क : “देशाचे माजी पंतप्रधान चरणसिंग चौधरी यांचा अपमान मी सहन करणार नाही. त्यांचे सार्वजनिक जीवन निष्कलंक राहिले chj;. देशातील शेतकऱ्यांप्रती त्यांचे समर्पणही होते. मी या घटनांचा साक्षीदार आहे,” असे स्‍पष्‍ट करत तुम्‍ही अशा प्रकारची भाषा वापरु नका, अशा शब्‍दांमध्‍ये राज्यसभेचे सभापती जगदीप धनखड यांनी आज ( दि.१०) विरोधी पक्ष नेते मल्‍लिकार्जुन खर्गे यांच्‍यासह विराेधी पक्षांच्‍या सदस्‍यांना सुनावले. माजी पंतप्रधान चौधरी चरणसिंग यांच्या भारतरत्न पुरस्कारावरील चर्चेदरम्यान विरोधी पक्षांच्‍या सदस्‍यांनी व्यत्यय आणल्यानंतर ते बोलत होते. यावेळी खर्गे आणि धनखड यांच्‍या शाब्‍दीक चकमकही झाली. राज्‍यसभेत प्रचंड गदारोळ आणि घोषणाबाजी झाली.

राज्‍यसभेच्‍या कामकाजाला सुरुवात होताच चरणसिंग यांना भारतरत्‍न पुरस्‍काराने सन्‍मानित केल्याबद्दलखासदार जयंत चौधरी (चरणसिंग यांचे नातू ) यांना धनखड यांनी बोलण्याची परवानगी दिली होती. यावर विरोधी पक्षाच्‍या सदस्‍यांनी आक्षेप घेतला. या आक्षेपानंतर त्‍यांनी खर्गे यांना सांगितले की, “एकतर तुमच्या लोकांवर नियंत्रण ठेवा किंवा उठून सभागृहाला संबोधित करा.”

‘तुम्‍ही सद्विवेकबुद्धीने निर्णय घ्‍या ‘ : खर्गे

यावेळी खर्गे म्हणाले की, “भारतरत्न पुरस्काराने सन्मानित व्यक्तींबाबत आमचा कोणताही वाद नाही. आम्ही त्या सर्वांचा आदरच करतो. मात्र जेव्हा सभागृहात चर्चेसाठी कोणताही विषय घेतला जातो तेव्हा तुम्ही आम्हाला (विरोधकांना) याबद्दल माहिती देण्यास सांगता. तुम्ही त्यांना कोणत्या नियमानुसार बोलण्याची परवानगी दिली होती, असा सवाल करत तुम्‍ही विरोधी आणि सत्ताधारी असा भेदभाव करु नका, तुम्‍ही सद्विवेकबुद्धीने निर्णय घ्‍या, असे आवाहनही त्‍यांनी केले.

तुम्‍ही चरणसिंग यांचा अपमान केला : धनखड

यावेळी मल्लिकार्जुन खर्गे आणि इतर काँग्रेस नेत्यांना उद्देशून राज्यसभेचे सभापती धनखड म्हणाले की, ‘तुम्ही चौधरी चरणसिंग यांचा अपमान केला आहे, तुम्ही त्यांच्या वारशाचा अपमान केला आहे. भारतरत्न चौधरी चरणसिंग यांच्यासाठी तुमच्याकडे वेळ नव्हता. सभागृहात असे वातावरण निर्माण करून तुम्ही देशातील प्रत्येक शेतकऱ्याला दुखावत आहात. आमचे डोके लाजेने झुकले पाहिजे.”

Back to top button