नवी दिल्ली ; पुढारी वृत्तसेवा : दिल्ली, महाराष्ट्र यासह अनेक राज्यांनी कोरोना लस टंचाईचा दावा करून लसीकरण केंद्र बंद करण्याची असहायता जाहीर केली आहे. त्यावर नवनियुक्त केंद्रीय आरोग्यमंत्री मनसुख मंडाविया यांनी, कोरोना प्रतिबंधक लस टंचाई नाहीच, लोकांमध्ये केवळ घबराट पसरावी म्हणून असली बेजबाबदार विधाने केली जात आहेत, अशा शब्दांत खडसावले आहे.
बुधवारी त्यांनी एकापाठोपाठ एक ट्विट करून यावर प्रकाशझोत टाकला. आरोग्यमंत्र्यांनी म्हटले आहे की, सरकारी आणि खासगी रुग्णालयांच्या माध्यमातून लसीकरणासाठी जून महिन्यात 11.46 कोटी डोस राज्यांना उपलब्ध करून देण्यात आले आहेत. जुलैमध्ये डोसची संख्या वाढवून 13.50 कोटी करण्यात आली.
जुलैमध्ये राज्यांना किती डोस दिले जातील याची माहिती केंद्र सरकारने राज्यांना 19 जूनलाच आगाऊ दिली होती. नंतर 27 जून आणि 13 जुलैला केंद्र सरकारने राज्यांना आधीच लसींबाबतची माहिती दिलेली होती. राज्यांना कधी किती डोस मिळणार आहेत, हे माहिती होते.
जर केंद्र सरकारने आधीच राज्यांना लसीच्या उपलब्धतेबद्दलची आधिक माहिती दिली असेल आणि याउपर लस घेण्यासाठी लांब रांगा असतील, तर हे संबंधित राज्यांचे अयोग्य व्यवस्थापन आहे.